बेळगाव : श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने आणि भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या सहकार्याने दिनांक 4 व 5 मार्च रोजी झालेल्या रिकामी गाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मजगाव, महामार्गावर ही शर्यत झाली होती.
बैलगाडी पूजन व फज्जा पूजन करून किरण जाधव यांच्या हस्ते शर्यतीचे उदघाटन करण्यात आले होते. ज्योतिबा गुरव यांनी टाईम किपर म्हणून काम पाहिले होते.
या शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. जाफरवाडी येथील श्री बसवान्ना प्रसन्न, बेळगुंदी येथील श्री रवळनाथ कलमेश्वर प्रसन्न व कुंदरगी येथील लक्ष्मी प्रसन्न यांनी शर्यतीत अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकाविला.
पहिल्या क्रमांकांच्या विजेत्याला 25 हजार, दुसऱ्या क्रमांकांच्या विजेत्याला 21 हजार तर तिसऱ्या क्रमांकांच्या विजेत्याला 18 हजार रुपयांचे रोख बक्षीस तसेच क्रमांक 4 ते 21 पर्यंतच्या विजेत्यांना अनुक्रमे 16 हजार ते 2 हजार रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. किरण जाधव आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस वितरीत करण्यात आले.
Belgaum Varta Belgaum Varta