येळ्ळूर : विद्यार्थ्यांनो तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा तुम्ही तुमच्यातील आळस झटकून टाका, त्याचबरोबर तुमच्यामध्ये जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, दूरदृष्टी व महत्त्वकांक्षा या गोष्टी तुम्ही अंगीकारल्या पाहिजेत. नव्या जगात स्पर्धा खूप आहे, त्या स्पर्धेत आपल्याला टिकून राहावयाचे झाल्यास आपल्याला लढावे लागेल, झगडावे लागेल व चिवट झुंज द्यावी लागेल तेव्हाच आपण जिंकू शकतो. त्याच बरोबर मोठे ध्येय डोळ्यासमोर ठेवून, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराक्रष्ट करा, असे विचार प्रा. सी. एम. गोरल यांनी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना व्यक्त केले.
सुळगे (येळ्ळूर) येथील भावकेश्वरी माध्यमिक विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व बक्षीस वितरण असा संयुक्त कार्यक्रम नुकताच शाळेच्या हॉलमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षक के. एन. पाटील हे होते. प्रारंभी विद्यार्थिनींच्या प्रार्थना गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर प्रा. सी. एम. गोरल व उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, के. एन. पाटील यांनी सरस्वती प्रतिमेचे पूजन केले, शिक्षिका पी. आर. पाटील व सी. डी. पाटील यांनी मरगाई देवीचे पूजन केले. यावेळी विद्यालयात वर्षभर विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण प्रा. सी. एम. गोरल, के. एन. पाटील, मुख्याध्यापक व्ही. एल. पाखरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षीस देऊन करण्यात आले. त्यानंतर गतवर्षी दहावी परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेली कुमारी प्रणाली यल्लाप्पा बस्तवाडकर हिचा रोख रक्कम व फिरता चषक देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षीचा आदर्श खेळाडू कुमार श्रेयस हेब्बळी व कु भावना पाटील यांचा सुद्धा फिरता चषक देऊन गौरव करण्यात आला. तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील आदर्श विद्यार्थी म्हणून कुमार सुरेश लोखंडे व आदर्श विद्यार्थिनी म्हणून कुमारी साधना पाटील यांचा सुद्धा फिरता चषक व प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांनी निरोप देणारी व निरोप घेणारी केली. दहावीच्या वर्गशिक्षिका साधना हन्नूरकर यांनी विद्यार्थ्यांना दहावी परीक्षे संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. सी. एम. गोरल व निवृत्त शिक्षक के. एन. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एल. पाखरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका उज्वला हट्टीकर यांनी केले, तर शिक्षिका सी. डी. पाटील यांनी शेवटी आभार मानले. यावेळी क्रीडा शिक्षक ए. वाय. मजूकर, अनिल कुकडोळकर शिक्षिका रेणुका थोरवत शिक्षिका अश्विनी चिट्टी व शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta