बेळगाव : प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात गुरू हे आलेले असतात आणि त्यांच्या सानिध्यात राहून आपण आपले जीवन सुखी समाधानी केले पाहिजे. प्राचीन काळापासून गुरूचा महिमा खूप मोठा असून आपल्या विद्यार्थ्यांची उन्नती पाहणे यामध्ये त्यांचे खरे समाधान असते, असे विचार म. ए. समितीचे युवा नेते आर. एम. चौगुले यांनी व्यक्त केले.
विश्व भारत सेवा समितीच्या हिंडलगा हायस्कूलमधील सन 1989 -90 सालच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे या नात्याने ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे माजी मुख्याध्यापक मालोजी अष्टेकर हे होते. प्रारंभी सर्व शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्यावतीने सत्कार करून गुरुचे स्मरण करण्यात आले. तत्पूर्वी व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन झाले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आर. एम. चौगुले आणि भारती सांगावकर यांची निवड करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना शिक्षकानी विद्यार्थ्यांच्या कलागुणांची प्रशंसा करून मार्गदर्शन केले. आनंद तुडयेकर आणि भारती सांगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास राजू पाटील, महादेव तेलवेकर, मारुती पाटील, दत्ता भोसले, सरिता भोसले, वैशाली पाटील, मनोहर कदम, हायस्कूलचे मुख्याध्यापक रवी तरळे, आजी-माजी विद्यार्थी -विद्यार्थीनी आणि पालक उपस्थित होते. स्नेहमेळाव्याचे औचित्य साधून माजी विद्यार्थ्यांनी शाळेला स्टेज बांधून बांधून देण्याची जाहीर केले.
Belgaum Varta Belgaum Varta