बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीची बैठक मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे संपन्न झाली.
बैठकीमध्ये पुढील काळात बेळगाव सीमाभागात मराठी भाषा संवर्धनासाठी व संरक्षणासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेण्याचे ठरविण्यात आले. 2023 हे साल गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त बेळगाव सीमा भागात प्राथमिक व माध्यमिक मुलांसाठी वाचन चळवळ राबविणे, स्थानिक मराठी कलावंतांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नाट्य चळवळ व नाट्य प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करणे. माध्यमिक व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या मराठी भाषेच्या कौशल्यासाठी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला वाव देण्यासाठी काव्य संमेलनाचे आयोजन करणे, प्रबोधिनीच्या वतीने माध्यमिक शाळांमध्ये फिरते वाचनालय सुरू करणे, मराठी भाषेच्या समृद्धीसाठी मराठी शिक्षकांच्या कार्यशाळा आयोजित करणे तसेच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी इतर अनेक वेगवेगळे उपक्रम हाती घेऊन मुलांना एक चांगले व्यासपीठ मिळवून देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर यांनी केले.
बैठकीला उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिव सुभाष ओऊळकर, मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, अनंत जांगळे, विजय बोंगाळे, प्रा. अशोक अलगोंडी, बसवंत शहापूरकर, इंद्रजित मोरे, गजानन सावंत, एन. सी. उडकेकर, बी. बी. शिंदे उपस्थित होते. आभार धिरजसिंह राजपूत यांनी मानले.
Belgaum Varta Belgaum Varta