बेळगाव : येथील सुवर्ण विधानसौध प्रांगणात आज मंगळवारी वीर राणी कित्तूर चन्नम्मा, संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. याच प्रांगणात छत्रपती शिवरायांची भव्य अश्वारूढ मूर्ती स्थापन करण्यात यावी अशी मागणी, गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. सुवर्णसौध प्रांगणातील शिवमुर्तीच्या मागणी संदर्भात कर्नाटक राज्य मराठा फेडरेशन वतीने गेली तीन वर्ष सातत्याने शासन दरबारी मागणी केली जात आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा परिषदेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या आंदोलनातही शिवमूर्ती स्थापन करण्याच्या मागणी संदर्भात शासनाकडे लक्ष वेधून घेण्यात आले होते. मात्र आज तीन स्वातंत्र्यवीर आणि महापुरुषांच्या प्रतिमा स्थापन केल्या नंतर सुवर्ण विधानसभा प्रांगणात छत्रपती शिवरायांची भव्य मूर्ती लवकरात लवकर स्थापन करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे.