बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात येतीय. यानिमित्त भक्तांनी श्रीराम मंदिरात मनोभावे पूजा करून मर्यादा पुरुषोत्तमाला नमन केले.
बेळगाव शहरात आज रामनवमीनिमित्त भक्तिभावाचा पूर ओसंडून वाहात असल्याचे चित्र दिसून आले. ठिकठिकाणच्या श्रीराम मंदिरात आज पहाटेपासूनच अबालवृद्ध भक्तांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. बेळगाव शहरातील रामदेव गल्लीतील जुन्या श्रीराम मंदिरात आज रामनवमी उत्सव भक्तांनी जल्लोषात साजरा केला. सुमारे 100 वर्षांहून अधिक जुन्या या मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. श्रीफळ, कपूर, उदबत्त्या, फुले आदी पूजा साहित्य घेऊन भाविकांनी मनोभावे पूजन करून श्रीरामाचे दर्शन घेतले. महिलांनी पाळणा गीते गाऊन बाल श्रीरामाची स्तुती केली.
रामदेव गल्लीतील श्रीराम मंदिरात सर्व वयोगटातील भाविकांनी आज दिवसभर दर्शनासाठी गर्दी केली होती. त्याचप्रमाणे शहापूर आचार्य गल्ली, वडगाव रामदेव गल्ली, भाग्यनगर येथील श्रीराम मंदिर यासह बेळगाव तालुक्यातील श्रीराम मंदिरातही आज रामनवमी भक्तिभावाने साजरी करण्यात आली. अनेक मंदिरात यानिमित्त भजन-कीर्तन, जागर, श्रीराम नामजप यज्ञ आदी विशेष धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.