खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील जवळ जवळ दहा विद्यार्थी नवीन राष्ट्रीय शिक्षण नीतीचे (NEP) चे बळी ठरले आहेत. बारावी नंतर महाविद्यालयात प्रवेश मिळविताना कसरत न करता प्रवेश प्रक्रिया सुलभ व्हावी याकरिता राज्य सरकारने UUCMS नावाचे संगणक वेबसाइट तयार केले. त्यामुळे विद्यार्थी त्या वेबसाइटच्या माध्यमातून प्रवेश घेतात. पुढे प्रवेशकर्त्या विद्यार्थ्याला लॉगिन आयडी आणि पासवर्ड दिला जातो. त्यामार्फत विद्यार्थी विषय निवड, परीक्षा शुक्ल भरून परीक्षेला अर्ज देखील करू शकतो. असे सर्व विद्यार्थ्याच्या हिताचे वाटत असले तरी संगणकावर अवलंबून असलेल्या या प्रणालीवर बहुसंख्य विद्यार्थ्याचा विश्वास उडाला आहे. देशात नवीन राष्ट्रीय शिक्षण नीती (NEP) चा स्वीकार करणारे पहिले कर्नाटक राज्य ठरले असले तरी या नव्या शैक्षणिक पद्धतीचा अवलंब करत असताना विद्यार्थी आणि महाविद्यालय पुरते रुळले नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र वेबसाइटच्या व्यस्ततेमुळे राणी चन्नमा विद्यापीठातील बेळगाव जिल्ह्यातील जवळ जवळ दीडशेहून अधिक विद्यार्थी चालू सेमिस्टर परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. यातील दहा विद्यार्थी खानापूर तालुक्यातील विविध पदवी महाविद्यालयातील आहेत. सदर विद्यार्थी राणी चन्नमा विद्यापीठातील कुलगुरू आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून वेबसाइटच्या व्यस्ततेमुळे आमचा परीक्षेचा अर्ज घेतला गेला नाही. आम्हाला परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, असे निवेदन घेऊन गेले असताना, विद्यार्थी आणि महाविद्यालयच याला जबाबदार असल्याचे सांगत विद्यापीठाने आपली जबाबदारी झटकली आहे. या विद्यापीठिय वर्तनाने वर्षभर अध्ययन करूनही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहिले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून न घेता चालविलेला हा मनमानी प्रकार त्वरित थांबवून विद्यार्थांचे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे आवाहन पालक आणि विद्यार्थी वर्गातून होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta