तालुका समितीच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : बेळगाव ग्रामीण मतदारसंघासाठी म. ए. समितीकडून उमेदवार निवडीची प्रक्रिया रविवारी आयोजित बैठकीत जाहीर करण्यात आली. उमेदवार निवड करताना प्रत्येक गावच्या सदस्याचा समावेश असलेल्या 101 जणांच्या सदस्यांची निवड करून कमिटीची स्थापना केली जाणार आहे. कमिटीने जाहीर केलेला उमेदवारच समितीचा अधिकृत उमेदवार असणार आहे.
मराठा मंदिर येथे झालेल्या या बैठकीला बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सदस्य व म. ए. समितीचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते. ऍड. राजाभाऊ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत व्यासपीठावर मनोज पावशे, एस. एल. चौगुले, ऍड. एम. जी. पाटील, मनोहर किणेकर, म्हात्रू झंगरूचे उपस्थित होते.
म. ए. समितीला या वेळच्या निवडणुकीमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता असल्याने आतापासूनच कार्यकर्ते निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. राष्ट्रीय पक्षात गेलेले अनेक कार्यकर्ते म. ए. समितीकडे परतत असून त्यांचे स्वागत केले जात आहे. उमेदवार निवडताना तो म. ए. समितीशी प्रामाणिक असावा व तरुणांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीदरम्यान केली.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत मिळालेल्या मतदानाचा आधार घेऊन 101 जन्मची कमिटी केली जाणार आहे. ज्या गावांमध्ये 0 ते 500 मते मिळाली आहेत त्या गावांतील एक सदस्य कमिटीमध्ये असणार आहे. ज्या गावांमध्ये मतदान अधिक झाले आहे तेथील अधिक सदस्य कमिटीवर असतील. या कमिटीत 15 महिलांनाही स्थान देण्यात आले आहे. पदाधिकाऱ्यांची 11 जणांची कमिटी या सर्वांना मार्गदर्शन करणार आहे.
यावेळी देवाप्पा शहापूरकर, शिवाजी खांडेकर, गुंडू गुंजीकर, वैजनाथ पाटील, मनोहर पाटील, मोहन शिंदे, कृष्णा धाईंगडे, अश्वजीत चौधरी, पिराजी मुचंडीकर, आनंद तुडयेकर, देवाप्पा पाटील, उदय सिद्दण्णावर, शिवाजी शिंदे, अभय कदम, डी. बी. पाटील, मनोहर हुक्केरीकर, रामचंद्र कुद्रेमनीकर, लक्ष्मण होनगेकर, विलास घाडी, यल्लाप्पा रेमाण्णाचे, आर. के. पाटील यांनी आपली मते मांडली.
Belgaum Varta Belgaum Varta