
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून दक्षिण मतदार संघातून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेले रमाकांत कोंडुसकर यांना जनतेचा वाढता पाठिंबा दिसून येत आहे. दक्षिण विधानसभा मतदार संघातील जनतेच्या प्रतिक्रियांचा कानोसा घेताना बहुसंख्य नागरिकांनी रमाकांत कोंडुसकर यांना पसंती दर्शविली आहे.
रमाकांत कोंडुसकर यांच्यासंदर्भात बहुसंख्य नागरिकांनी सकारात्मक प्रतिक्रिया देत समितीमधून रमाकांत कोंडुसकर यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी उचलून धरली आहे. दक्षिणमधून एकूण ८ उमेदवारांनी समितीकडे विनंतीपत्र सादर केले असून यामध्ये सर्वाधिक आघाडीवर कोंडुसकर यांचेच नाव आहे. कोविड काळात रमाकांत कोंडुसकर यांनी सर्वसामान्य नागरिकांना दिलेले सहकार्य, शेतकऱ्यांशी असलेली बांधिलकी यासह छत्रपती शिवरायांचा झालेला अवमान आणि यानंतर सुरु झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभाग, राजहंसगड, रेल्वे स्थानक, शिवसृष्टी यासंदर्भात उठविलेला आवाज, यासंदर्भात मांडलेली रोखठोख भूमिका, जनतेच्या मूलभूत सुविधांचा सातत्याने घेतलेला आढावा, अडीअडचणीच्या काळात प्रत्येक गरजवंताला केलेले सहकार्य, कार्यकर्त्यांचे मोठे बळ, मराठी भाषेसंदर्भातील आंदोलने, मराठी भाषिकांच्या हितासाठी उभारलेल्या लढ्यातील सक्रिय सहभाग, प्रशासकीय अत्याचाराविरोधात उठविलेला आवाज यासह अनेक गोष्टींसाठी त्यांना जनतेतून पाठिंबा व्यक्त होत आहे.
दक्षिण विधानसभा मतदार संघातील विविध क्षेत्रातील नागरिक, व्यावसायिक, व्यापारी, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी अशा विविध स्तरावरील नागरिकांनी रमाकांत कोंडुसकर यांना जाहीर पाठिंबा दिला असून महाराष्ट्र एकीकरण समितीने त्यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे.
दक्षिण विधानसभा मतदार संघात रमाकांत कोंडुसकर त्यांच्यासारखाच तगडा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरल्यास विरोधकांना टक्कर देणे शक्य आहे. या मतदार संघात अनेकांनी आजवर आपले नशीब आजमावून पाहिले आहे. सध्या जनतेला या भागात सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या समस्याच सोडविणारा नेता हवा आहे. रमाकांत कोंडुसकर यांची कार्यपद्धती आणि त्यांच्या मागे असणारे कार्यकर्त्यांचे मोठे बळ हि बाब पाहता समितीने रमाकांत कोंडुसकर यांनाच निर्विवादपणे उमेदवारी द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta