हुतात्म्यांना विनम्र अभिवादन
उचगाव : बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील विधानसभेसाठी उभे असलेले महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांच्या सदाशिवनगर येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये १९८६ च्या आंदोलनामध्ये हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेत. हुतात्म्यांचे स्वप्न साकार करूया आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांना भरघोस मताने निवडून आणूया अशी सर्वांनी यावेळी शपथ घेतली.
प्रारंभी उपस्थिताचे स्वागत माजी आमदार मनोहर किणेकर यांनी करून आपला सीमाप्रश्न आणि मराठी बांधवांसाठी जो लढा देत आहोत त्याची पार्श्वभूमी सांगितली आणि येती निवडणूक ही किती महत्त्वाची आहे विधानसभेवर आपला प्रतिनिधी निवडून येणे हे मराठी बांधवांसाठी किती महत्त्वाचे आहे याबाबत माहिती दिली. यानंतर समिती नेते आणि माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस मनोज पावशे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना इतिहासात ज्यांनी ज्यांनी हौतात्म्य पत्करले त्यांना अभिवादन तर केलेच पाहिजे आपण हे करणे कर्मप्राप्त आहे, त्याचबरोबर या लढ्यामध्ये कर्नाटक सरकारची हुकूमशाही मोडण्याकरिता किंवा कर्नाटक सरकारची दडपशाही मोडून काढण्याकरिता प्रखर आंदोलने सीमा भागातील मराठी माणसांकडून झाली त्या आंदोलनामध्ये सुद्धा बऱ्याच जणांनी लाठ्या काठ्या खाल्या, आपलं रक्त सांडलं बऱ्याच आपल्या वडीलधाऱ्या मंडळींनी तीन महिन्यापासून ते सहा महिन्यापर्यंत कारावास भोगला त्यांची सुद्धा आठवण करून तसेच याबरोबरच कर्नाटक सरकारने केलेल्या गोळीबारात असंख्य तरुण नेते मंडळी जखमी झाले. हुतात्मे झाले, यांची आठवण ठेवून येती विधानसभा निवडणूक ही महत्त्वाची आहे पुन्हा एकदा मराठी माणसाची ताकद, शक्ती कर्नाटक सरकारला दाखवण्याची ही वेळ आली आहे. यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे आर. एम. चौगुले यांना आपले बहुमोल मत देऊन निवडून आणूया.
यावेळी माजी आमदार मनोहर किणेकर, बेळगाव नगरीचे माजी महापौर शिवाजी सुटंकर, तालुका समितीचे उपाध्यक्ष ऍड. राजाभाऊ पाटील, चिटणीस एम. जी. पाटील, युवा आघाडीचे चिटणीस मनोहर संताजी, सुरेश राजूकर, मनोज पावशे, दीपक पावशे, उमेदवार आर. एम. चौगुले, नारायण सांगावकर, राजू किणेकर, चेतन पाटील, मदन बामणे, एस आर पाटील, बी एस पाटील, कृष्णा उंद्रे, एन.के.कालकुंद्री, टी.के मंडोळकर यासह बेळगाव ग्रामीण मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
उपस्थिताचे स्वागत व आभार मनोहर संताजी यांनी केले.
Belgaum Varta Belgaum Varta