बेळगाव : सर्वजण एकत्र आल्यामुळे बेळगाव उत्तरचा गड काबीज करण्याची संधी महाराष्ट्र एकीकरण समितीला मिळाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले.
बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्या रामलिंगखिंड गल्लीतील मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करून श्री. दळवी बोलत होते. ज्येष्ठ सीमा सत्याग्रही रामा शिंदोळकर यांच्या हस्ते हुतात्म्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. माजी महापौर शिवाजी सुंठकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. श्री. दळवी म्हणाले, अनेक दिवसांनंतर आपण सर्वजण एकत्र आलो आहोत. कर्नाटक सरकार मराठी भाषिकांत नेहमीच फूट पाडण्याचा प्रयत्न करते. मात्र, यावेळी सर्वजण संघटित झाल्यामुळे आपल्याला यश मिळणार आहे. ही लढाई साधी नाही त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी जबाबदारी घेणे आवश्यक आहे. आपल्याला चांगली संधी चालून आली असून प्रत्येकाने विजयश्री खेचून आणण्यासाठी प्रयत्न करावेत. आपल्याला निवडणुकीच्या प्रचारासाठी अतिशय कमी वेळ मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या भागाची जबाबदारी घेऊन कामाला लागावे, असे आवाहन केले.
माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांनी, काहीजण जाणीवपूर्वक मराठी भाषिकांना डिवचण्याचा प्रयत्न करतील मात्र, मराठी भाषिकानी शांततेने प्रचारावर भर द्यावा. महिलाही यावेळी मोठ्या संख्येने प्रचारासाठी बाहेर पडतील, असा विश्वास व्यक्त केला. माजी महापौर मालोजी अष्टेकर, मध्यवर्तीचे खजिनदार प्रकाश मरगाळे, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी महापौर सरिता पाटील, शुभम शेळके, नारायण खांडेकर, ऍड. अमर येळ्ळूरकर आदींनी मनोगत व्यक्त केले. नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, नगरसेविका वैशाली भातकांडे, बाळाराम पाटील, विजय बोंगाळे, मदन बामणे, गजानन पाटील, अमित देसाई, सुनील बाळेकुंद्री, संतोष कृष्णाचे, भाऊ शहापूरकर, माया कडोलकर, गणेश ओऊळकर, बी. ओ. येतोजी, चंद्रकांत गुडकल ऍड. सुधीर चव्हाण, ऍड. शाम पाटील, शंकर पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta