बेळगाव : उद्या मंगळवार दिनांक 25 पासून अलतगा येथील श्री महालक्ष्मी देवी यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत आहे. तब्बल 75 वर्षानी गावात महालक्ष्मी यात्रा होत असल्यामुळे, ग्रामस्थांमध्ये अमाप उत्साहाचे वातावरण आहे. उद्या मंगळवार 25 एप्रिल पासून सुरु होणारी यात्रा, बुधवार दिनांक 3 मे रोजी समाप्त होणार आहे. यात्रा केवळ एक दिवसावर येऊन ठेपल्याने यात्रेसाठी अलतगे ग्रामस्थ सज्ज झाले आहेत.
उद्या मंगळवारी पहाटे सहा वाजून पंधरा मिनिटांनी सूर्योदयाला अक्षतारोपण कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवी रथावर विराजमान होणार आहे. संपूर्ण गावभर भव्य प्रमाणात देवीची मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंगळवार रात्री रथ थांबलेल्या ठिकाणी ह भ प उदयरावजी शास्त्री महाराज सांगली यांचे कीर्तन होणार आहे. जवळजवळ वीस भजनी मंडळांचा सहभाग राहणार आहे.
बुधवार दिनांक 26 रोजी सकाळी रथाची आणि महालक्ष्मी देवीची पूजा करून परत मिरवणुकीला सुरुवात होईल. त्यानंतर विविध मार्गांवर फिरून श्री ब्रह्मलिंगेश्वर हायस्कूलच्या पटांगणावर उभारण्यात आलेल्या भव्य शामियान्यात सायंकाळी पाच वाजता महालक्ष्मी देवी गदगेवर विराजमान होणार आहे.
सदर यात्रा नऊ दिवस चालणार आहे. 75 वर्षांनी होत असलेल्या महालक्ष्मी यात्रेला मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta