बेळगाव : ऐन उन्हाळ्यात राजहंसगडला पाणी समस्येच्या झळा पोहचू लागल्या आहेत, मुबलक प्रमाणात पाणी साठा असूनही पंचायतच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंचायत विकास अधिकारी (पी डी ओ) फोन उचलत नाहीत आणि पंचायतमध्ये गेल्यावर भेटत नाहीत, यामुळे नागरिकानी सरळ तालुका पंचायत, जिल्हा पंचायत, आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पाणी समस्या दूर करण्यासाठी साकडे घातले.. राजहंसगड गावाला पाणी टंचाई ही एक गंभीर बाब आहे, गावात विहीर अथवा बोरवेल किंवा नदी नाल्याचा कोणताही स्त्रोत नाही, याबाबत सरकारने जवळपास एक कोटी रूपये खर्च करून नंदिहळ्ळीपासून पाईप लाईन करून पाणी समस्या निवारण करण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र पंचायतचे योग्य नियोजन नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे, सध्या सर्वत्र सरकारी अधिकाऱ्यांना निवडणूक सेवा घालण्यात आली आहे, या कारणातून पी डी ओ जनतेचे फोन उचलण्यास टाळाटाळ करीत आहेत याचा फटका मात्र सर्व सामान्य जनतेला बसत आहे, तरी याबाबत जिल्हा प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व पाणी टंचाई दूर करावी, अशी मागणी होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta