बेळगाव : हलगा-बस्तवाड भागात म. ए. समिती ग्रामीणचे अधिकृत उमेदवार आर. एम. चौगुले यांची मंगळवारी सायंकाळी अभूतपूर्व प्रचारफेरी काढण्यात आली. या प्रचारफेरीत कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. चौगुले यांना निवडून आणण्याचा निर्धार करून पाठिंबा जाहीर करण्यात आला.
मंगळवारी सायंकाळी हलगा गावातून चौगुले यांची प्रचारफेरी लक्षणीय ठरली. या प्रचारफेरीत तरुणांचा सहभाग व त्यांचा उत्साह अधिक दिसून आला. या वेळेला ग्रामीणमध्ये भगवा फडकविणारच असा ठाम निर्धार या तरुण कार्यकर्त्यांनी केला असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मरगाई गल्ली, हलगा येथील राम मंदिरात प्रारंभी पूजन करून चौगुले यांच्या प्रचारफेरीला सुरुवात झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन शिवाजी सुंठकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच धर्मवीर संभाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन आर. एम. चौगुले यांनी केले.
लक्ष्मी गल्ली, विठ्ठल रखुमाई गल्ली, शिवाजी गल्ली, नवी गल्ली आदी विविध गल्ल्यांमध्ये प्रचारफेरी काढण्यात आली. यावेळी संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच समितीच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले. यावेळी आर. आय. पाटील, सरस्वती पाटील, डॉ. मधुरा गुरव, ऍड. सुधीर चव्हाण आदींसह म. ए. समितीचे नेते तसेच हलगा गावातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.