बेळगाव : भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव जिल्ह्यातील कुडची (ता. रायबाग) आणि कित्तूर येथे प्रचार सभा होणार असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रचार सभांचे वेळापत्रकही निश्चित झाले आहे.
भारतीय जनता पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी गेल्या आठवड्यात जाहीर झाली होती. यापैकी कांही प्रचारक आधीच कर्नाटकात दाखल झाले आहेत. आता येत्या 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रायबाग तालुक्यातील कुडचीसह हुमनाबाद, विजापूर आणि बेंगलोर उत्तर येथे प्रचार सभा होणार आहेत. त्याचप्रमाणे 30 एप्रिल रोजी त्यांच्या कोलार , चन्नपट्टण, बेलूर व म्हैसूर येथे, 2 मे रोजी चित्रदुर्ग, विजयनगर, सिंधनुर व गुलबर्गा येथे, 3 मे रोजी मूडबिद्री, कारवार व कित्तूर येथे, 6 मे रोजी चित्तापूर, गंजनगुड्ड, तुमकुर ग्रामीण, बंगळूर दक्षिण येथे तर 7 मे रोजी बदामी, हावेरी, शिमोगा ग्रामीण व बंगळूर मध्य येथे पंतप्रधानांच्या प्रचार सभा होतील.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा कर्नाटक दौरा सध्या सुरू असून येत्या 7 मे पर्यंत त्यांच्या कर्नाटकात विविध ठिकाणी सभा होणार आहेत. त्यापैकी 6 मे रोजी अमित शहा बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी -सदलगा, सौंदत्ती व रामदुर्ग मतदार संघात प्रचार सभा घेणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आदी स्टार प्रचारकांच्या प्रचार सभांचे कार्यक्रम देखील निश्चित झाले आहेत.