
बेळगाव : विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी समितीच्या पाठिशी राहून आपल्या समस्या सोडवून घ्याव्यात, असे आवाहन बेळगाव दक्षिण मतदारसंघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
श्री. कोंडुसकर यांनी, बेम्को हैड्रोलिक्स या नामांकित कंपनीसह उद्यमबाग परिसरातील विविध औद्योगिक वसाहतीला भेट देऊन प्रचार केला. बेळगावच्या विकासासाठी, मातृभाषेच्या संरक्षणासाठी बेम्को हैड्रोलिक्स कंपनी सोबत आल्यामुळे माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. देशाची आणि समाजाची आर्थिक घडी बसविण्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोलाचा वाटा असतो. या सर्व कामगारवर्गाच्या, औद्योगिक क्षेत्रातील सर्व कारखान्यांच्या समस्या, अडीअडचणी दूर करण्यासह अनेक मागण्यांची पूर्तता करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही श्री. कोंडुसकर यांनी दिली. त्यानंतर व्हेगा हेल्मेट्स कंपनीच्या ठिकाणी भेट दिली. येथे उपस्थित कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोंडुसकर यांच्यासोबत जाण्याचा निर्धार केला.
आगामी काळात उद्यमबाग परिसरात कोणत्याही समस्या उद्भवणार नाहीत. कामगारांना कोणताही सामाजिक त्रास होणार नाही, याची मी काळजी घेईन, असे आश्वासनही श्री. कोंडुसकर यांनी दिले. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीला विजयी करणे काळाची गरज आहे. बेळगाव आणि परिसरातील अनेक कामगारांना विविध प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते, याची आपल्याला जाणीव आहे. त्यामुळे कामगारांना विविध प्रकारच्या सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta