बेळगाव : निवडणूक आयोगाला मराठी भाषेसोबत भगव्यात ध्वजाचीही कावीळ झाल्याची प्रचिती शहापूर विभागात आली. शिवजयंती निमित्त शहापूर विभागात सर्वत्र भगव्या पताका व भगवे ध्वज लावण्यात आले आहेत. घरांवर व सार्वजनिक ठिकाणांवर लावण्यात आलेले भगवे ध्वज हटविण्याची मोहीम निवडणूक अधिकाऱ्यांनी हाती घेतली. मात्र मराठी भाषिक तरुणांनी या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरत ही कारवाई बंद पाडण्यास भाग पाडले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे. त्यामुळे प्रशासनाला हाताशी धरत मराठी भाषिकांच्या घरांवरील भगवे ध्वज व इतरत्र लावण्यात आलेल्या भगव्या पताका काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. हा प्रकार निदर्शनास येताच मराठी भाषिक नागरिकांनी दक्षिण विभागाचे निवडणूक अधिकारी व महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांना याबाबत संपर्क करून जाब विचारला असता आयुक्तांनी तातडीने ही कारवाई थांबविली. महानगरपालिकेचे कर्मचारी या परिसरात जाऊन ध्वज आणि पताका हटविण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना चांगले धारेवर धरले निवडणूक काळात राष्ट्रीय पक्षाचे ध्वज काढणे हे बंधनकारक आहे. मात्र भगवा ध्वज हा कोणत्याही पक्षाचा ध्वज नाही त्यामुळे भगवा ध्वज काढणे हे बेकायदेशीर आहे असे असताना देखील निवडणूक आयोगाच्या या कारवाईमुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta