Wednesday , December 10 2025
Breaking News

रमाकांत कोंडुसकर प्रचंड मताधिक्याने विजयी होणार

Spread the love

मी ज्यावेळी एखाद्या निवडणुकीचा अंदाज व्यक्त करतो त्यावेळी चोहोबाजुंनी परिस्थिती पाहून, विरोधक उमेदवाराची ताकद, त्याच्याशी माझ्या उमेदवाराने दिलेली टक्कर हे पाहूनच कोणताही उतावीळपणा न करता मगच एखाद्या निष्कर्षावर येऊन पोहचतो. यावेळी बेळगाव दक्षिण मतदार संघात म.ए. समितीचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील हा माझा अंदाजच नसून ठाम विश्वास आहे.
रमाकांत कोडुसकर यांना म.ए. समितीची उमेदवारी मिळाल्यावर पहिल्यांदा त्यांच्या कार्यकर्त्यांत एकच स्फूरण चढले व ते त्याच रात्री निवडणुकीच्या कामाला लागले मग म.ए. समितीचे कार्यकर्तेही मनापासून ‘आता नाही तर कधीच नाही ‘या विचाराने, ईर्ष्येने रमाकांत कोडुसकर यांच्या विजयासाठी एकदिलाने प्रचारात झोकून दिले.
विरोधी उमेदवाराला गेल्या निवडणुकीत मिळालेले मताधिक्य तोडून विजय मिळवणे तेवढे सोपे नाही याची जाणीव माझ्यासारख्या अनेक अभ्यासू कार्यकर्त्यांना होती पण म.ए. समितीवर असलेला मराठी जनतेचा अपार विश्वास, निवडणूक रिंगणात असलेला म.ए. समितीचा एकच उमेदवार व रमाकांत कोंडुसकर यांचा साधेपणा व विनयशीलपणा पाहून जी हक्काची मते विरोधकाकडे गेली होती ती परत समितीकडे येऊ लागली व त्याचा प्रत्यय पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद यामधून येऊ लागला त्यामुळे इतके दिवस निवडणूक ‘सहज’ घेणाऱ्या व मतांचा आकडा लाखाच्या घरात घेऊन जाण्याची स्वप्ने पाहणाऱ्या विरोधक उमेदवाराची पायाखालची वाळू घसरू लागली आहे.
माझ्या अभ्यासानुसार आठ दिवसापूर्वी एकंदर परिस्थिती पाहता विरोधक उमेदवार थोड्या मताधिक्याने आघाडीवर होता पण त्यानंतरच्या 4 ते 5 दिवसात परिस्थिती पूर्णपणे बदलल्याने व संपूर्ण मराठा समाजाबरोबरच मराठी भाषिकांमधील अनेक लहान मोठ्या समाजाने देखील कोडुसकर यांना काही ठिकाणी उघड तर काही ठिकाणी छुप्पा पाठिंबा व्यक्त केला. तर काही कारणामुळे उघडपणे येऊ शकलो नाही तरी आमचे 100 टक्के मतदान हे तुम्हालाच आहे असा विश्वास कोंडुसकर यांना इतर भाषिकांनी व अनेकांनी प्रत्यक्ष भेटून दिला. आता सर्वसामान्य जनतेलाही ‘बदल’ हवा आहे यामुळेच अन्य भाषिक व समाजही आता कोंडुसकर यांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याची शक्यता आहे.
दि. 6 मे रोजी सायंकाळी अनगोळ भागात पदयात्रेचे आयोजन केले होते. तेथील युवकांनी व जनतेने केलेली तयारी व त्यांचा निर्धार पाहून ही पदयात्रा नव्हे तर जनतेचा झंझावात असेल असा विश्वास मी बाळगला होता. त्यामुळेच अनगोळच्या पदयात्रेला जाण्यापूर्वी उमेदवार रमाकांत कोडुसकर हे मध्यवर्ती कार्यालयात आले असता त्यावेळी त्यांच्यासोबत घेतलेल्या छबीसोबत घातलेल्या कॅप्शनमध्ये ‘भावी आमदार’ असा आत्मविश्वासपूर्वक उल्लेख केला होता व तो विश्वास 100 टक्के सार्थ ठरणार हे 13 तारखेला कळेलच.
एकंदर परिस्थिती पाहता व विरोधी उमेदवाराकडे असलेली धनशक्ति पाहता तसेच त्यांने गेल्यावेळी घेतलेले मताधिक्य याचा सारासार विचार करता विजय मिळवणे तेवढे सोपे नव्हते पण रमाकांत कोडुसकर सारखा तगडा उमेदवार, सगळ्यांशी आदरभाव बाळगून असणारा पण प्रसंगी का रे ला का रे म्हणूनच उत्तर देणारा धाडसी उमेदवार यामुळे रमाकांत कोडुसकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होतील यात शंका नाही. या दोन दिवसांत त्यांच्या मताधिक्यात आणखी वाढ होऊ शकते. आता ही जबाबदारी तुम्हा आम्हा सर्वांची आहे.
‘आता आमच ठरलयं’

– ज्येष्ठ पत्रकार, शिवराज पाटील

About Belgaum Varta

Check Also

देशाला देशभक्त, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ तरुणांचीच गरज : नायब सुभेदार सुभाष भट्ट

Spread the love  शिवानंद महाविद्यालयातील ३० हून अधिक एनसीसी विद्यार्थी सैन्यात भरतीनिमित्त सत्कार कागवाड : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *