बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात एकूण 76.70% मतदान झाले असून सर्व ईव्हीएम आरपीडी कॉलेजमधील स्ट्राँगरुममध्ये कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आल्या आहेत. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. राज्यासह बेळगाव जिल्ह्यात बुधवारी विधानसभा निवडणुकीचे मतदान अखेर सुरळीत पार पडले. उन्हाच्या झळा सोसत मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. संपूर्ण जिल्ह्यात एकूण 76.70% मतदान झाले. सायंकाळी 6 वाजता मतदानाची वेळ संपत आली तरी अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे रांगेतील मतदारांना स्लिप देऊन मतदान करून घेण्यात आले. त्यानंतर मतदान प्रक्रिया संपल्यावर टप्प्याटप्प्याने पोलीस संरक्षणात जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रातून रात्री उशिरापर्यंत मतपेट्या कडेकोट बंदोबस्तात बेळगावातील आरपीडी महाविद्यालयात स्थापन केलेल्या स्ट्राँगरुममध्ये आणण्यात आल्या. स्वतः जिल्हाधिकारी व मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांच्या देखरेखीखाली स्ट्राँगरुम सील करण्यात आली.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्य जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी सांगितले की, जिल्ह्यातील सर्व 18 मतदारसंघात काल शांततेत मतदान पार पडले. त्यानंतर सर्व 18 निवडणूक अधिकाऱ्यांनी मतपेट्या राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये स्थापन केलेल्या स्ट्रॉंगरूममध्ये आणल्या. आज पहाटेपर्यंत ही प्रक्रिया सुरु होती. सर्व उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्षांचे एजंट यांच्या उपस्थितीत आज छाननी प्रक्रिया पार पडेल. मतदानापूर्वी प्रात्यक्षिक मतदान घेऊन ईव्हीएम क्लिअर करण्यात आले होते. त्याबाबत काही ठिकाणाहून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे उमेदवार, राजकीय पक्षांचे प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएम क्लिअरिंग प्रक्रिया पार पाडण्यात येईल. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर उद्या पुन्हा एकदा निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
मतमोजणीच्या तयारीविषयी बोलताना जिल्हाधिकारी पाटील म्हणाले की, शनिवारी आरपीडी महाविद्यालयातील स्ट्रॉंगरूममधून मतपेट्या बाहेर काढून सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात येईल. सर्व्हिस व्होटर्सची संख्या 26 हजारहून अधिक आहे. त्यांच्या मोजणीसाठी 1 टेबलची व्यवस्था केली आहे. पोस्टल बॅलेट्सची मोजणी सर्वात आधी करण्यात येईल. त्यासाठी 2 टेबल्स निश्चित केले आहेत. शनिवारी मतमोजणीदिवशी सकाळी 8 वाजेपर्यंत येणारी पोस्टल मते मोजणीसाठी स्वीकारण्यात येतील. सर्व 18 मतदारसंघांसाठी प्रत्येकी 2 टेबल्स अशी एकूण 36 टेबल्स मांडून मतमोजणी करण्यात येईल. त्यानंतर जसजशी मतमोजणी पूर्ण होईल तसतसे निकाल जाहीर करण्यात येतील असे त्यांनी सांगितले.
एकंदर, जिल्ह्यातील सर्व मतदार संघात निवडणूक सुरळीत पार पडल्यानंतर शनिवारच्या मतमोजणीसाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने पुरेपूर तयारी केल्याचे दिसून येते.
Belgaum Varta Belgaum Varta