बेळगाव : व्यवसाय करीत असतानाच आपण मिळवलेल्या नफ्याचा काही भाग समाजासाठी राखून ठेवून लाखो रुपयांच्या देणग्या विविध संस्थांना देणारे अडत व्यापारी शंकरराव गंगाराम पाटील यांनी हयात असताना आपल्या गावासाठी जाफरवाडी गावाकरिता एक सभागृह बांधण्याची योजना आखली होती. ती आता प्रत्यक्षात साकारली असून त्या कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे उद्घाटन गेल्या सोमवारी जाफरवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्षस्थानी जाफरवाडीचे ज्येष्ठ नागरिक पिराजी कल्लाप्पा पाटील हे होते तर पाहुणे म्हणून दैनिक रणझुंजारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर, व्यापारी गजानन काविलकर, श्रीकांत कृष्णा पाटील हे उपस्थित होते तर वक्ते म्हणून जीएसएस महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. आनंद मेणसे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात किरण शंकराव पाटील यांच्या प्रास्ताविक आणि स्वागताने झाली. प्रकाश शंकरराव पाटील यांनी व्यासपीठावरील मान्यवरांना सन्मानित केले. स्व. गंगाराम बाळाप्पा पाटील, स्व. शंकरराव गंगाराम पाटील व स्व. सौ. मंजुताई शंकरराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांचे हस्ते करण्यात आले. सभागृहाच्या उभारणीसाठी सहकार्य केलेल्या अनेकांचा भेटवस्तू व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला तर ग्रामस्थांच्या वतीने प्रकाश आणि किरण यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना मनोहर कालकुंद्रीकर यांनी शंकरराव पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला “अंधश्रद्धा विरोधी शंकररावानी केलेल्या कार्याचे त्यांनी कौतुक केले. समाजासाठी काहीतरी करावे या भावनेतून आपले आयुष्य शंकररावांनी खर्ची घातले” असे ते म्हणाले. गावासाठी सभागृह उभारण्याचे दादांचे स्वप्न त्यांच्या दोन्ही चिरंजीवांनी प्रत्यक्षात उतरण्यासाठी जे कार्य केले त्याबद्दल श्रीकांत कृष्णा पाटील यांनी गौरवोद्गार काढले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी शंकरराव पाटील यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला,” मराठा समाज सुधारला पाहिजे, तो अंधश्रद्धाविरोधी असला पाहिजे, तो व्यसन विरहित असला पाहिजे या उद्देशाने शंकरराव पाटील यांनी केलेले कार्य हे जनतेसमोर आहे. सीमा प्रश्न सुटला पाहिजे यासाठी त्यांनी केलेले योगदान मोठे आहे, असे ते म्हणाले.
ग्रामस्थांच्या वतीने पी. आर. पाटील यांचेही भाषण झाले. जाफरवाडी गावच्या शैक्षणिक सामाजिक अध्यात्मिक कार्यात शंकरावांनी स्वतःला झोकून देऊन काम केले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
सौ. सरोज प्रकाश पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून श्री. अनंत लाड यांनी करून शंकरराव पाटील यांच्या जीवनाचा आढावा घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta