बेळगाव : कारगिल मॅरेथॉनच्या पूर्वतयारीसाठी बेळगावात 11 जूनला विश्वभारती कला क्रीडा फौंडेशनतर्फे मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमध्ये विजयी होणाऱ्या धावपटूंना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. विश्व भारती कला क्रीडा फौंडेशनचे सचिव रवींद्र बिर्जे यांनी बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, विश्व भारती कला क्रीडा फौंडेशन ही एक नोंदणीकृत एनजीओ असून बेळगाव जिल्ह्यातील क्रीडापटूंना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबवते. संस्थेने आतापर्यंत 15 मॅरेथॉन, कुस्ती व कबड्डी स्पर्धा आणि 1 गोवा मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. कारगिल युद्धातील शहीद जवानांच्या स्मरणार्थ दरवर्षी 16 सप्टेबरला कारगिल येथे राष्ट्रीय पातळीवरील मॅरेथॉनचे आयोजन केले जाते. या मॅरेथॉनमध्ये बेळगाव जिल्ह्यातील क्रीडापटू चमकावेत यासाठी संस्थेतर्फे बेळगावात 2 महिने अगोदर, 11 जूनला विविध गटांत मॅरेथॉनचे आयोजन केले आहे. या मॅरेथॉनमधील विजेत्यांना कारगिल येथील तापमानात धावणे सोपे व्हावे यासाठी बेळगाव आणि पुणे येथे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रवींद्र बिर्जे पुढे म्हणाले की, बेळगावात लेले ग्राउंडवर विविध गटांतील मॅरेथॉन स्पर्धाना 11 जूनला सकाळी 6 वाजता प्रारंभ होईल. सर्वांत मोठी 42 किमी मॅरेथॉन लेले ग्राऊंड ते बेळगुंदी येथील खाद्य निगम गोदाम व तेथून परत लेले ग्राऊंड अशा 2 फेऱ्यांत होईल. दुसरी 21 किमीची हाफ मॅरेथॉन 6.15 वाजता लेले ग्राऊंड ते बेळगुंदी येथील खाद्य निगम गोदामपर्यंत घेण्यात येईल. तिसरी 10 किमीची मॅरेथॉन 6.30 वाजता लेले ग्राऊंड ते मंडोळी शिवाजी महाराज पुतळा या दरम्यान होईल. याशिवाय शालेय मुलांसाठी 3 किमीची मॅरेथॉन लेले ग्राऊंडवर घेण्यात येईल. त्याचप्रमाणे विकलांगांसाठी वेगळी मॅरेथॉन घेण्यात येणार आहे. या मॅरेथॉनसाठी कोल्हापूर व अन्य राज्यातील स्पर्धकांनीही नोंदणी केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील धावपटूंना, युवक-युवतींना प्रोत्साहन द्यावे हा उद्देश असल्याने त्यांनी मोठ्या संख्येने यात सहभागी व्हावे असे आवाहन बिर्जे यांनी केले.
यावेळी विश्व भारती कला क्रीडा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल देसाई, संचालिका राजश्री तुडयेकर, कर्लेकर, आदी उपस्थित होते.