बेळगाव : बंगळूर येथील कंठिरवा स्टेडियमवर कर्नाटकाचे ३२ वे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री म्हणून डी. के. शिवकुमार यांनी आज (दि.२०) दुपारी १२.३० वाजता शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. तसेच ८ आमदारांनाही मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील यमनकर्डी मतदारसंघातून विजयी झालेले सतीश जारकीहोळी यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.
कर्नाटकात मोठ्या प्रमाणात वाल्मिकी समाज असून, या समाजाची मते मिळवण्यात काँग्रेसचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळींना यश आले. त्यांनी राज्यात वाल्मिकी समाज आणि इतर अनुसूचित जमातींचे संघटन करुन काँग्रेस पक्षाला पाठिंबा मिळवून दिले. तसेच बेळगाव जिल्ह्यात देखील काँग्रेस पक्षाला अभूतपूर्व यश मिळण्यास त्यांचे योगदान असल्याचे पक्ष मानतो. बंगळूर येथे वाल्मिकी समाजाच्या नेत्यांनी बैठक घेऊन सतीश जारकीहोळींना काँग्रेस पक्षाने चांगले पद देण्याची मागणी केली होती. त्यामुळे सतीश जारकीहोळींना पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे.
सतीश जारकीहोळी दोनवेळा निजदकडून विधान परिषदेवर निवडून गेले. त्यांनी २००६ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर २००८ पासून यमकनमर्डी मतदार संघातून सलग चौथ्यांदा ते विधानसभेवर निवडून आले आहेत.
आ. सतीश जारकीहोळी यांचं राहणीमान अत्यंत साधे आहे. पण, काँग्रेसच्या राजकारणावर त्यांची पकड आहे. आताच्या निवडणुकीत ते चौथ्यांदा निवडून आल्याने त्यांची महत्त्वाच्या मंत्रिपदावर नियुक्ती निश्चित मानली जात होती.
एखाद्या घरात दोन व्यक्ती आमदार किंवा खासदार झाल्यास त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप केला जातो. याला मात्र जारकीहोळी बंधू अपवाद ठरले आहेत. यावेळच्या विधानसभा निवडणुकीतही रमेश जारकीहोळी, सतीश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे निवडून आले आहे. त्यांचे कनिष्ठ बंधू लखन जारकीहोळी हे यापूर्वीच अपक्ष म्हणून विधान परिषदेचे आमदार आहेत. तिघेही बंधू चारहून अधिकवेळा निवडून आल्याने सत्ता कोणत्याही पक्षाची येवो लाल दिव्याची गाडी जारकीहोळी घराण्याला ठरलेलीच आहे.
जिल्ह्यातील आठ मतदारसंघांत प्रभाव
जारकीहोळी बंधूंचा बेळगाव जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघात प्रभाव आहे. गोकाक, यमकनमर्डी, आरभावी या मतदारसंघांसोबत बेळगाव ग्रामीण, अथणी, कागवाड, निपाणी, बेळगाव ग्रामीण या मतदारसंघावरही त्यांचा प्रभाव आहे.
Belgaum Varta Belgaum Varta