बेळगाव : संपतीच्या वादातून चुलत भावाकडून चाकूने भोसकून युवकाचा खून केल्याची घटना रविवारी दुपारी तीनच्या सुमारास होसुरात घडली आहे.
मिलिंद चंद्रकांत जाधव (वय 28) असे खून झालेल्या दुर्दैवी युवकाचे नाव आहे. मिलिंद हा शनिवारी शिवजयंती चित्ररथ मिरवणूक आटोपून घरी झोपला होता. त्यावेळी संशयित आरोपी चुलत भावाकडून धारदार चाकूने हल्ला करत खून करण्यात आला आहे.
मयत मिलिंदच्या मांडीवर आणि पायावर जोरदार वार करण्यात आले त्यामुळे रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला आहे, अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
घटनास्थळी शहापूर पोलीस निरीक्षक सुनील कुमार एच यांनी धाव घेत पंचनामा केला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मिलिंद याचा त्याच्या भाऊबंदकीत संपत्तीवरून वाद होता यावरून हा खून झाला आहे. या प्रकरणी अभिषेक जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
दुपारी दिवसा ढवळ्या भर वस्तीत हा खून झाल्याने या परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.