बेळगाव : सागर शिक्षण (बी. एड्.) महाविद्यालयच्यावतीने तीन दिवसीय “नागरिक प्रशिक्षण शिबिर” मण्णूर गावात आयोजित करण्यात आले होते. उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डाएटचे प्राचार्य एस्. डी. गंजी, ग्रा. पं. उपाध्यक्ष सरीता नाईक, ग्रा. पं. सदस्य राम चौगुले, दत्तू चौगुले उपस्थित होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर. व्ही. हलब होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रशिक्षणार्थींच्या प्रार्थना व स्वागतगीताने झाली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रा. डी. एम्. चव्हाण यांनी स्वागत केले. डाॅ. टी. एम्. नौकुडकर यांनी प्रास्ताविक केले.
प्रा. एम्. बी. नरसन्नावर यांनी अतिथींची ओळख करून दिली. प्रमुख अतिथींची मार्गदर्शनपर भाषणे झाली. त्यानंतर संपूर्ण मण्णूर गावाची झाडलोट करुन व सडा घालून स्वच्छता करण्यात आली. जनजागृतीपर प्रभातफेरी काढून शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सायंकाळी शिबिरार्थींनी संगीत प्रा. विनायक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बहारदार सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम गावाच्या मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात समस्त गावकर्यांच्या उपस्थितीत प्रस्तुत केला. प्रशिक्षणार्थींनी
सादर केलेल्या सुमधूर गायन तसेच नृत्य-नाट्य आणि शेवटी राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित सुंदर कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.
दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वा. योग व ध्यान-धारणा प्रात्यक्षिके झाली. संपूर्ण परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर एसबीजी आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सहकार्याने मण्णूर गावातील गावकर्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. सायंकाळी मण्णूरमधील नागरिकांच्या उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रम प्रस्तुत करुन सर्वांना मंत्रमुग्ध केले. अपूर्वा गोडसे व उर्मिला यांनी सूत्रसंचालन केले.
समारोप कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डाएटचे ज्येष्ठ प्रा. बी. एस्. कुसुगळ व प्रा. एन्. आर. पाटील उपस्थित होते. शिबिर सचिव वैशाली देसाई यांनी अहवाल सादर केला. प्राचार्य आर. व्ही. हलब यांचे अध्यक्षिय भाषण झाले. विद्यार्थी प्रतिनिधी मिनाक्षी कौलगे यांनी कार्यक्रम संयोजन केले व गिरिजा धनशेट्टी यांनी आभार मानले. वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी प्रा. कल्पना धामणेकर, प्रा. एस्. एस्. पाटील, प्रा. एन्. आय. सनदी, प्रा. नंदगाव, प्रा. दानम्मा के., आय. एन्. शेख, सर्वेश कामठे, दयानंद असोदे उपस्थित होते. कार्यक्रमास सर्व प्रशिक्षणार्थी, प्राध्यापक वर्ग, नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta