राज्यातील सत्तांतरामुळे नव्याने चर्चेची शक्यता
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील २८ गावांचा ‘बुडा’ कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव अद्यापही मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. राज्यात सत्तांतर झाल्याने या प्रस्तावावर फेरविचार होणार असल्याची माहिती मिळाली. राज्यात भाजपचे सरकार सत्तेत असताना २०२० मध्ये ‘बुडा’ प्रशासनाकडून हा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.
आधी २७ गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय झाला होता, पण नंतर त्यात गोजगा या गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे संख्या २८ झाली. हा प्रस्ताव २०२१ मध्ये शासनाकडे पाठविण्यात आला आहे. गुळाप्पा होसमनी हे त्यावेळी बुडा अध्यक्ष तर प्रीतम नसलापुरे बुडा आयुक्त होते. प्रस्ताव पाठविल्यावर तो मंजूर व्हावा यासाठी बुडाकडून सातत्याने पाठपुरावा झाला, पण त्याला यश आले नाही. भाजप सरकारच्या काळातच प्रस्ताव मंजूर व्हावा यासाठी प्रयत्न झाले, पण ते प्रयत्न अयशस्वी ठरले. आता काँग्रेस सरकारच्या काळात त्या प्रस्तावाचा फेरविचार होणार असल्यामुळे प्रस्ताव रद्द होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. बुडा कार्यक्षेत्रात आधी २५ गावांचा समावेश होता. त्यानंतर बस्तवाड व शगनमट्टी या दोन गावांचा नव्याने समावेश करण्यात आला. २०१६ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाल्यामुळे कार्यक्षेत्रातील गावांची संख्या २७ झाली. २०१९ मध्ये ‘बुडा’ने सांबरा व निलजी या दोन गावांचा बुडा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा निर्णय घेतला होता. सांबरा येथे विमानतळ असल्यामुळे तेथील इमारतींच्या उंचीवर निर्बंध घालणे आवश्यक होते. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. बुडाच्या बैठकीत त्यावेळी या विषयावर चर्चा झाली. तत्कालीन जिल्हाधिकारी आर. विशाल यांनी केवळ दोनच गावांचा ‘बुडा’ कार्यक्षेत्रात समावेश करण्यास विरोध दर्शविला. तालुक्यातील आणखी काही गावांचा समावेश करण्याची सूचना दिली. त्यानुसार ‘बुडा’ प्रशासनाकडून २७ गावांचा कार्यक्षेत्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केला. त्यात आधी गोजगा या गावाचा समावेश नव्हता. नंतर गोजगा गावचा समावेश झाल्यामुळे संख्या २८ झाली.
Belgaum Varta Belgaum Varta