बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगांव, ज्योती करियर अकॅडमी बेळगाव, भाऊराव काकतकर महाविद्यालय, ज्योती पदवी पूर्व महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संघटना बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या सोमवार दि. 5 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता आयएएस 2023-24 परीक्षा उत्तीर्ण परीक्षार्थींचा सत्कार सोहळा, मार्गदर्शन शिबिर आणि व्याख्यान अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बी. के. कॉलेज अर्थात भाऊराव काकतकर महाविद्यालयाच्या सभागृहात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळचे उपाध्यक्ष, म. ए. समितीचे नेते व कायदे सल्लागार ॲड. राजाभाऊ पाटील अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आयएएस परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील श्रृती यरगट्टी (देशात 362 वा क्रमांक) यांच्यासह डेप्युटी डायरेक्टर स्टेट अकाउंटंट अँड ऑडिट डिपार्टमेंट कर्नाटक गव्हर्नमेंट प्रोबेशनरी श्रीमती नाझिया पटवेगार आणि युनियन बँक ऑफ इंडिया अँड स्टेट बँक ऑफ इंडिया या परीक्षेत उत्तीर्ण झालेली अधिकारी प्रतीक्षा पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यासह विविध परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गुणवंतांचा सन्मान केला जाणार आहे. तरी शिक्षण प्रेमींसह हितचिंतक आणि नागरिकांनी या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहण्याबरोबरच व्याख्यान आणि मार्गदर्शन शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन द.म.शि. मंडळ आणि ज्योती करिअर अकॅडमीचे संचालक समन्वयक प्रा. अमित सुब्रमण्यम यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta