विकास आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
बेळगाव : स्मार्ट सिटी प्रकल्पाची पुरेशी अंमलबजावणी; पिण्याच्या पाण्याचा पुरवठा; आरोग्य सुविधा, कचरा विल्हेवाट; स्मशानभूमी विकास, पायाभूत सुविधांची तरतूद यासह सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याची जबाबदारी सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांची आहे. याबाबत सर्वांनी प्रभावीपणे काम करावे, अशी सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या. महापालिकेच्या सभागृहात आज बुधवारी स्मार्ट सिटी, पाणी पुरवठा, हेस्कॉम यासह विविध विभागांच्या कामांच्या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
या बैठकीत मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी आपापल्या भागातील समस्यांचा पाढा मंत्री जारकीहोळी यांच्यासमोर मांडला. बहुसंख्य नागरिकांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. विकास कामात आपल्या परिसरावर अन्याय झाल्याची खंत ही अनेकांनी बोलावून दाखवली.
यावेळी बोलताना मंत्री सतिश जारकीहोळी म्हणाले, लोकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्याची जबाबदारी आपली आहे. नागरिकांनी विविध विभागा अंतर्गत येणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. स्मार्ट सिटी, हेस्कॉमसह महत्त्वाच्या विभागांची स्वतंत्र बैठक घेतली जाईल. नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना थोडा वेळ दिला जाईल. लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिक चांगले काम केले पाहिजे. महापालिका सदस्यांनी नमूद केलेली कामे प्राधान्याने करावीत, असे ते म्हणाले.
या बैठकीला महिला बाल विकास कल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार अभय पाटील, आमदार राजू शेठ, आमदार चन्नराज हट्टीहोळी, महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील नगर विकास खात्याच्या अधिकारी पद्मा आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मनपा आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाळी, लक्ष्मी निपाणीकर, भाग्यश्री हुग्गी यांच्यासह अन्य मनपा अधिकाऱ्यांनी शहरातील विविध विकास कामांची माहिती दिली.
Belgaum Varta Belgaum Varta