
बेळगाव : धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेध करत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने बेळगावात भव्य आंदोलन छेडण्यात आले. विविध मठाधीश, स्वामीजींच्या नेतृत्वाखाली शहरातील चेन्नम्मा सर्कल पासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.धर्मांतर बंदी कायदा मागे घेण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा निषेध करत बेळगावात शनिवारी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कल येथे आंदोलन करून भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
भारत हा हिंदू देश आहे आणि संविधानाने येथे हिंदू आणि अन्य धर्मियांना एकत्र राहण्याची परवानगी घटनेने दिली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटकातही हिंदूंसोबतच अन्य धर्मियांनाही त्यांचा धर्म पाळण्याची परवानगी आहे. आम्ही यास सहमत आहोत. परंतु हिंदूंना आमिष दाखवून किंवा धमकावून जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराचा किंवा बुद्धिभेद करून केलेल्या धर्मांतराचा आम्ही निषेध करतो. भारत हे हिंदू राष्ट्र आहे. कर्नाटक हा भारताचा एक भाग आहे. हिंदूंना धर्मांतरापासून वाचवणे आणि आपल्या धर्माचे रक्षण करणे हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. अल्पसंख्याकांना खुश करण्यासाठी सावरकरांसारख्या प्रतिष्ठित देशबांधवांचे परिचयात्मक धडे काढून टाकण्याच्या काँग्रेस सरकारच्या निर्णयाचा निषेध केला करतो, असे या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी बोलताना बजरंग दलाचे जिल्हा संयोजक भावकाण्णा लोहार म्हणाले की, मुस्लिमांशिवाय हिंदूंनीही काँग्रेस सरकारला मोठ्या प्रमाणात मतदान केले. त्यांच्या मतांमुळेच काँग्रेस सत्तेवर आली, केवळ अल्पसंख्याकांमुळे नाही. हे काँग्रेसने मतदान केलेल्या संपूर्ण हिंदू समाजाचा विश्वासघात करण्यासारखे आहे. काँग्रेस सरकारच्या मंत्रिमंडळात धर्मांतर कायद्यावर बंदी घालण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकारिणी सदस्या उज्ज्वला बडवाण्णाचे म्हणाल्या की, संपूर्ण देशात केवळ भारत हाच एकमेव हिंदू देश आहे. हिंदूंचे बळजबरीने किंवा आमिष दाखवून होणारे धर्मांतर रोखण्यासाठी मागील भाजप सरकारने केलेला धर्मांतर बंदी कायदा काँग्रेस सरकारने एका विशिष्ट धर्मियांचे तुष्टीकरण करण्याच्या हेतूने रद्द केला आहे. याचा कर्नाटकातील समस्त हिंदू जनता निषेध करते असे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्व हिंदू परिषद क्षेत्रीय धार्मिक विभाग प्रमुख बसवराज म्हणाले की, कर्नाटकात मुस्लिम आणि विशेषतः ख्रिश्चनांकडून मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर केले जात आहे. गेल्या 8 वर्षांत कर्नाटकात 40 लाख हिंदूंचे आमिषे, प्रलोभने दाखवून धर्मांतर करण्यात आले आहे. परदेशातून करोडो रुपये आणून ख्रिश्चन्स पाद्री, नन्स भोळ्याभाबड्या हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. धर्मांतरामुळे दहशतवाद वाढतो असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. धर्मांतरातून राष्ट्रांतर करण्याचे मोठे षडयंत्र हिंदूंविरोधी शक्तींनी आखले आहे. त्याला काँग्रेस सरकार खतपाणी घालत आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो. सरकारने त्वरित कायदा रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा येत्या काळात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
विश्व हिंदू परिषदेचे उत्तर कर्नाटक प्रांत अध्यक्ष डॉक्टर एस आर रामनगौडा, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष श्रीकांत कदम, कृष्णा भट्ट, मुरुगेंद्रगौडा पाटील, शरद पाटील तसेच हिंदूबांधव, भगिनी तसेच वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta