बेळगाव : कर्नाटक राज्य कायदा सेवा प्राधिकरण बेंगलोरतर्फे येत्या 8 जुलै रोजी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अदालतीमध्ये बेळगाव जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 73 प्रलंबित खटल्यांपैकी 19000 खटले निकाली लावण्यासाठी घेण्यात येणार असले तरी किमान 14000 खटले निकाली लागण्याची शक्यता आहे. तरी पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाने केले आहे.
दर तीन महिन्यातून एकदा राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन केले जात असते. या अदालतीमध्ये बँक, सोसायटी, धनादेश न वटणे, फसवणूक, फौजदारी, कौटुंबिक, विमा नुकसान भरपाई याशिवाय दिवाणी खटले ही निकालात काढले जातात. याखेरीज प्रलंबित खटलेही निकालात काढण्याचा प्रयत्न केला जातो.
कायदा सेवा प्राधिकरणाचा हा उपक्रम पक्षकारांना लाभदायक ठरत आहे. कारण सर्वसामान्यपणे पक्षकारांना आपल्या खटल्याच्या निवाड्यासाठी न्यायालयाचे उंबरठे झिजवावे लागत असतात. मात्र तरीही खटल्याचा निवाडा लागण्याची शक्यता कमीच असते. त्यामुळे पक्षकारांचा पैसा व वेळ वाया जात असतो.
दुसरीकडे लोक अदालतमध्ये खटले विनाशुल्क निकालात काढण्यात येत असल्याने पक्षकारांना आर्थिक भार पडत नाही. त्यामुळे लोकअदालतीला पक्षकारांची पसंती असते. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या लोक आता अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आला असून येत्या 8 जुलै 2023 रोजी होणाऱ्या लोकअदालतीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.