बेळगाव : हातात पताका डोक्यावर तुळशी कट्टा आणि टाळ मृदंगाचा गजर करत बसवण कुडची येथून वारकरी भक्तांची पायी दिंडी नुकतीच पंढरपूरच्या दिशेने नुकतीच रवाना झाली.
बसवन कुडची येथे गेल्या शनिवारी सकाळी विठ्ठल रखुमाई मंदिरपासून दिंडीला प्रारंभ झाला. प्रारंभी नगरसेवक बसवराज मोदगेकर, समाजसेवक परशराम बेडका आणि डॉ. सतीश चौलीगेर यांनी दिंडीची पूजा करून दिंडीला चालना दिली. नामदेव जैनोजी यांनी तुळस पूजन केले. यावेळी विठ्ठल रखुमाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष जोतिबा जैनोजी यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. दिंडीची टाळ मृदंगाच्या जल्लोषात गल्लोगल्ली पूजा आरती करण्यात आली.
सदर दिंडीमध्ये गावातील वारकऱ्यांसह 85 हुन अधिक वारकरी सहभागी झाले असून पायी दिंडीचे हे 25 वे वर्ष आहे. दिंडी सुळेभावी, होसूर, गोकाक, नागनूर, कोळीगूड, भरमखोडी, यरदळी, सिंगेनहल्ली, बामणी, कासेगावमार्गे जाणार आहे. दिंडी संस्थापक अर्जुन मुतगेकर, दिंडी चालक पांडुरंग एकणेकर, अन्नाप्पा इटगी, विणेकरी रामा मडीवाळ, अनिल कोळूचे, रमेश जोडगुंडे व गावकरी तसेच महिला याचा दिंडीमध्ये सहभाग आहे.