
बेळगाव : राज्य सरकारची अन्नभाग्य योजना साकार होऊ नये यासाठी धडपडणाऱ्या केंद्र सरकारचा कर्नाटक काँग्रेस पक्षातर्फे तीव्र निषेध करण्यात आला.
सर्वसामान्य गरीब जनतेला 10 किलो मोफत तांदूळ देण्याच्या कर्नाटक राज्य सरकारच्या महत्त्वाकांशी “अन्यभाग्य” योजनेसाठी तांदूळ उपलब्ध करण्यास केंद्र सरकारच्या निर्देशानुसार भारतीय अन्न महामंडळाने ऐनवेळी नकार दिली. याच्या निषेधार्थ कर्नाटक काँग्रेस पक्षातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व काँग्रेसच्या अन्य नेते मंडळींच्या नेतृत्वाखाली राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी केंद्र सरकार आणि भारतीय अन्न महामंडळाच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चाच्या अग्रभागी हातात तांदळाच्या बुट्ट्या घेऊन काँग्रेस कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
काँग्रेस आश्वासन दिल्याप्रमाणे गरिबांना 10 किलो तांदूळ मोफत देत आहे. हे न पाहवल्यामुळे भारतीय अन्न महामंडळाला निर्देश देऊन केंद्र सरकारने तांदळाचे वितरण रोखले आहे असे सांगून यावर उपाय शोधण्यासाठी सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली कॅबिनेट मंत्र्यांची चर्चा सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत कोठूनही तांदूळ खरेदी करून आम्ही आमची योजना निश्चितपणे राबवणार आहोत, असे बेळगाव उत्तरचे आमदार राजू उर्फ आसिफ सेठ यावेळी बोलताना म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta