
बेळगाव : अडचणीत सापडलेल्या व्यक्तींच्या मदतीसाठी धावून जाणारे फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे अध्यक्ष संतोष दरेकर यांच्या निस्वार्थी कार्याची दखल फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरिया क्रमांक नऊने घेतली आहे. दरेकर यांच्या समाजसेवेची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. दहा हजार रु रोख, शाल आणि तुळशीचे रोप देऊन फ्रिमसन्स लॉज व्हिक्टोरियाच्या पदाधिकार्यांनी दरेकर यांचा सन्मान केला. सत्काराच्या वेळी देण्यात आलेली दहा हजार रुपयांची रक्कम संतोष दरेकर यांनी करोशी येथील बाजीराव सुळकुडे या तरुणाच्या लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरेकर यांनी अनेक रुग्णांना रक्त देण्यास मदत केली आहे. अनेक निराधार व्यक्तींना निवारा मिळवून देण्यासही पुढाकार घेतला आहे. कुटुंबातील कर्ती व्यक्ती गमावलेल्या अनेक कुटुंबांना नियमित मदत अनेक दानशूर व्यक्तींच्या आणि मित्रांच्या सहाय्याने ते करत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत त्यांनी मिळवून दिली आहे. जखमी पक्षी, प्राण्यांनाही त्यांनी जीवदान मिळवून दिले आहे. यापुढे देखील अडचणीत असलेल्या व्यक्तींना मदत करण्याचा निश्चय त्यांनी केला आहे.
लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी आर्थिक मदतीची गरज
घरात गरिबी व हलाखीची परिस्थिती, शेत नाही, पत्नी, लहान दोन मुले अशातच घरातील कर्त्याला लिव्हर सिरोसीसचा आजार झाला असून लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज आहे. यासाठी 22 लाख रुपयांचा खर्च येणार असून हा खर्च कसा करायचा, या विवंचनेत करोशी (जि. चिकोडी) येथील सुळकुडे कुटुंबीय आहे. 32 वर्षीय तरुण बाजीराव सुळकुडे याचा पान शॉपचा व्यवसाय करीत पत्नी, आई व दोन मुलगे असा परिवार आहे. मोठे भाऊ पत्रकार आहेत. स्वमालकीची शेती नसून हातावरचे पोट आहे. अशातच मागील दोन वर्षांपासून बाजीराव हे लिव्हरच्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांचे बंधू के. एस. सुळकुडे यांनी चिकोडी, निपाणी व बेळगाव येथील विविध इस्पितळात उपचार दिले. पण तात्पुरते बरे होऊन पुन्हा तब्येत बिघडते. आजपर्यंत बाजीराव यांच्या उपचारासाठी आठ लाखापर्यंत खर्च झाला आहे. सध्या त्यांच्यावर बेळगाव केएलई संस्थेच्या डॉ. प्रभाकर कोरे इस्पितळात उपचार सुरू होते. तेथील ज्येष्ठ डॉक्टरांनी बाजीराव सुळकुडे यांचे लिव्हर निकामी झाले असून लिव्हर ट्रान्सप्लांटशनची गरज असल्याचे सांगितले आहे. यासाठी सुमारे 22 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पण या कुटुंबाकडे असलेले पैसेदेखील खर्च झाल्याने आता लिव्हर ट्रान्सप्लांटशनसाठी व इतर वैद्यकीय उपचारासाठी पैसे नाहीत.
बाजीराव सुळकुडे यांची दिवसेंदिवस तब्येत खालावत असून लवकरात लवकर लिव्हर ट्रान्सप्लांटशन करण्याची गरज आहे.
त्यामुळे लोकप्रतिनिधी, राजकीय व्यक्ती, संघ संस्था, दानशूर नागरिकांनी आर्थिक मदत करण्याची गरज आहे.
दानशूर व्यक्तींनी मदतीसाठी फेडरल बँक खाते क्रमांक : 19390100033095, आयएफएससी कोड : एफडीआरएल 0001939 किंवा 9632731806 या क्रमांकावर पाठवून मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta