Wednesday , April 22 2026
Breaking News

लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला प्रतिनिधित्व हवेच : श्यामसुंदर गायकवाड यांची मागणी

Spread the love

 

कित्तूर : कर्नाटक राज्यात मोठ्या संख्येने असलेल्या मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला नेहमीच खंबीर साथ दिली आहे. राज्यातील भाजपच्या यशात मराठा समाजाचा मोठा वाटा आहे. याची जाणीव ठेवून भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाला उत्तर कन्नडा आणि बेळगाव लोकसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी. मी स्वतः उत्तर कन्नडा लोकसभा मतदारसंघातून भाजप वतीने निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती, कर्नाटक क्षत्रिय मराठा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष श्यामसुंदर गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
कित्तूर येथील शासकीय विश्रामगृहात पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, गेली 26 वर्षे मी भाजप पक्षासाठी काम करत आहे. अनेक महत्त्वाची पदे जबाबदारीने पार पाडली आहेत. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कर्नाटक राज्यातील मराठा समाजाच्या हितासाठी सातत्याने काम करत आहे.
मराठा समाजाने भारतीय जनता पक्षाला राज्यात यश मिळवून देण्यात मोठे प्रयत्न आणि परिश्रम घेतले आहेत. मराठा समाजाचे प्राबल्य प्रत्येक पक्षांनी ओळखले आहे. मात्र, राज्यात मराठा समाजाला राजकीय प्रतिनिधित्व देणे दुर्लक्ष केले जात आहे. आम्ही केलेल्या आंदोलनानंतर, कर्नाटक राज्यात छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यात येऊ लागली. सातत्याने केलेल्या आरक्षणाच्या मागणीनंतर मराठा समाजाचा 2ए मध्ये समावेश करण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. मराठा विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.मात्र मराठा समाजाला अपेक्षित असलेले राजकीय प्रतिनिधी देण्यात आलेले नाही. त्यामुळे समाजात असंतोष आहे. याची गंभीर दखल पक्षाच्या वरिष्ठांनी घ्यावी.
आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने उत्तर कन्नडा आणि बेळगाव जिल्ह्यात मराठा समाजाला उमेदवारी जाहीर करावी. उत्तर कन्नडा जिल्ह्यातून आपण स्वतः निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. या मतदार संघात माझा चांगला जनसंपर्क आहे. सध्याचे भाजप खासदार अनंतकुमार हेगडे यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने ते निवडणूक लढवणार नसल्याचे कळते. त्यामुळे पक्षाने मला या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. त्याचा निश्चितच लाभ शेजारील मराठी प्राबल्य असलेल्या मतदारसंघातही होईल. याबाबत आपण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली आहे. वरिष्ठ नेत्यांकडून आपणाला सकारात्मक आश्वासन मिळाले आहे. मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीत प्रतिनिधित्व दिल्यास, पक्षाच्या लोकसभा निवडणुकीतील जागा वाढतील, असा विश्वास शामसुंदर गायकवाड यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार मनोहर कडोलकर, कित्तूर भाजप नेते बसप्पा हैबती, मदनकुमार भैरपण्णावर, आनंदराव घोरपडे, निळकंठ निरोळी, व अन्य सदस्य उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेकायदा खाणप्रकरणी आठ जणांवर गुन्हा

Spread the love  किणयेतील प्रकार; दोन जागांतून शासनाची लाखोंची फसवणूक बेळगाव : बेळगाव तालुक्यातील किणये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *