बेळगाव : मोसमी पाऊस न पडल्याने आलमट्टी, मलप्रभा, हिप्परगी आणि हिडकल जलाशयातील पाणीपातळीत कमालीची घट झाली आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी केला जावा अशी सूचना प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
आज गुरुवारी (६ जून) प्रादेशिक आयुक्त कार्यालयात आलमट्टी जलाशय, मलप्रभा प्रकल्प, घटप्रभा प्रकल्प आणि हिप्परगी प्रकल्प समितीच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते. यावेळी विविध धरणातील पाणीसाठ्याची सविस्तर माहिती घेतल्यानंतर पुढे बोलताना नितेश पाटील म्हणाले, सध्या बेळगाव जिल्ह्यातील हिरण्यकेशी नदीत अल्प प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.परंतु घटप्रभा नदीवरील 14 बहु-ग्रामीण पेयजल प्रकल्पांपैकी बेळगाव जिल्ह्यातील हुलकुंद, सैदापुरा, अरकेरे, चिंचलकट्टी अनवला आणि बागलकोट जिल्ह्यातील कटगेरी बहु-ग्राम पेयजल प्रकल्प आधीच स्थगित आहेत. सिंचनासाठी सिंचन सल्लागार समिती किंवा शासनाची परवानगी घेता येईल, असे निर्देश प्रादेशिक आयुक्त नितेश पाटील यांनी दिले.