
चिक्कोडी : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाचे जैन मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज आज अनंतात विलीन झाले. त्यांच्यावर आज हिरेकोडी गावातील नंदीपर्वत आश्रमाशेजारील शेतात भक्तांच्या अलोट जनसागराच्या उपस्थितीत जैन धर्माच्या विधींप्रमाणे अंत्यसंस्कार करण्यात आले.
चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावातील नंदी पर्वत आश्रमाचे मुनी १०८ कामकुमार नंदी महाराज यांची दोन दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली होती. मारेकऱ्यांनी त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून बंद कूपनलिकेत टाकले होते. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी बेळगाव जिल्हा रुग्णालयात पाठवले होते. त्यानंतर मुनींचा मृतदेह बेळगावहून थेट हिरेकोडी नंदीपर्वत आश्रमात मोठ्या पोलीस बंदोबस्तात आणण्यात आला. त्यानंतर जैन धर्माच्या विधी-परंपरेनुसार आश्रमाच्या शेजारील शेतजमिनीत अंत्यसंस्कार झाले. यावेळी हजारो जैन बांधवांनी, भक्तांनी कामकुमार नंदी महाराज यांना साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला.
जैन धर्माच्या परंपरेनुसार मुनी महाराजांच्या भावाचे पुत्र भीमगौंडा उगरे यांनी मुनींना अग्नीस्पर्श दिला.
अंत्यसंस्काराच्या वेळी नांदणीचे जीनसेना भट्टारक स्वामीजी, कोल्हापूरचे लक्ष्मीसेन भट्टारक स्वामीजी, वरूरचे धर्मसेन भट्टारक स्वामीजी, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, आमदार गणेश हुक्केरी, युवा नेते उत्तम पाटील, भाजप चिक्कोडी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश नेर्ली, सरचिटणीस सतीश अप्पाजीगोळ, वीणा पट्टणकुडी आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta