
बेळगाव : हिरेकुडी (ता. चिक्कोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे प. पू. श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या हत्येच्या निषेधार्थ व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज मंगळवारी सकाळी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आले.
विविध मठाधीश स्वामीजींच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या या मोर्चाला आज सकाळी शहरातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवन येथून प्रारंभ झाला. त्यानंतर चन्नम्मा सर्कल येथे विहींप व बजरंग दल कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. तेजप्रति भीम पिठाचे श्रीहरी गुरु महाराज, केदार मठ मुत्नाळ शाखेचे श्री शिवानंद शिवाचार्य स्वामीजी, विश्व हिंदू परिषद जिल्हा अध्यक्ष कृष्णा भट आदींच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला हा मोर्चा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होता. या मोर्चात जैन बांधवांसह विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालय आवारात या मोर्चाची सांगता झाली. त्यानंतर सरकारच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. सदर निवेदनाद्वारे जैन मुनिंच्या हत्येचा निषेध करण्याबरोबरच पोलीस प्रशासनाने तात्काळ आरोपींना गजाआड करावे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta