खानापूर : आई-वडील आपल्या मुलांना चांगले वळण लागावे, आपल्या मुलांनी वामार्गाला लागू नये म्हणून आपल्याला बोलत असतात. तेव्हा मुलांनी आपल्या आई वडिलांना परत उत्तर देऊ नये. कोणत्याही व्यसनापासून दूर राहून एकाग्रतेने अभ्यास करावा, असे प्रतिपादन बेळगाव येथील इंडाल कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक अभियंता विजय मन्नूरकर यांनी केले.
मनगुती येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांना शिवाजीनगर बेळगाव येथील स्मार्ट ग्रुपच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. के. स्वामी हे होते. मुलींच्या स्वागत गीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सुरुवातीला स्मार्ट ग्रुपचे अध्यक्ष अभियंता विजय मन्नूरकर यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. टेक्निशियन मारुती गावडे यांच्या हस्ते पुष्पहार घालून महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. श्री. के. एम. राऊत यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मुख्याध्यापक श्री. डी. के. स्वामी यांनी पाहुण्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मारुती गावडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तर डी. के. स्वामी यांचे अध्यक्ष भाषण झाले.
याप्रसंगी डी. एस. पाटील, सुनील शिंदे, श्रीकांत हदगल, नारायण मंडोळकर, महादेव साळस्कर, सुनील पवार, एस एम कोतेकर, बाळू मगदूम, आर. बी. शमणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर एस. के. मेंडुले यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta