बेळगाव : भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक आणि यद्येळू कर्नाटका हागू प्रगतीपर संघटनेगळू यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नरगुंद -नवलगुंद आंदोलनात बलिदान दिलेल्या शेतकऱ्यांचा 43 वा हुतात्मा दिन कार्यक्रम आज सकाळी गांभीर्याने पार पडला.
शहरातील कन्नड साहित्य भवनमध्ये आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बीकेएस तालुका अध्यक्ष संजीव डोंगरगाव हे होते. तसेच व्यासपीठावर भारतीय कृषक समाजाचे राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांच्यासह प्रमुख पाहुणे म्हणून एआयटीयुसीचे नेते माजी महापौर ॲड. नागेश सातेरी व जमात-ई-इस्लामचे नेते इस्माईल मकानदार तर प्रमुख वक्ते म्हणून कन्नड संघटनांचे अध्यक्ष अशोक चंदरगी उपस्थित होते. त्याचप्रमाणे निमंत्रित पाहुणे म्हणून दुर्गेश मेत्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिवलीला मिसाळे, बीकेएस राज्य संयुक्त सचिव मल्लिकार्जुन डोंगरगावी, एपीएमसी भाजी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बसनगौडा पाटील, राजशेखर तळवार आणि भारतीय कृषक समाज महिला विभागाच्या जिल्हाध्यक्ष गीता धरेन्नावर हजर होते. प्रारंभी सर्वांचे स्वागत करण्यात आल्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी दोन मिनिटे मौन पाळून हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली.
आपल्या प्रास्ताविक भाषणात राज्याध्यक्ष सिदगौडा मोदगी यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना हुतात्मा झालेल्या शेतकऱ्यांबद्दल माहिती दिली. प्रमुख वक्ते अशोक चंदरगी यांनी यावेळी आपले समयोजित मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. कार्यक्रमास भारतीय कृषक समाज, संयुक्त होराट कर्नाटक यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे पदाधिकारी सदस्य व शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली काल्पार यांनी केले. शेवटी सतीश पाटील यांनी सर्वांचे आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta