बेळगाव : कंग्राळी बुद्रुक येथील श्री कलमेश्वर को. ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा व सभासदांच्या गुणी विद्यार्थ्यांचा गौरव व मान्यवरांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम रविवारी संस्थेच्या सभागृहामध्ये पार पडला.
सभेच्या अध्यक्षस्थानी अध्यक्ष तानाजी पाटील होते. व्यासपीठावर उपाध्यक्ष सुभाष हुद्दार, संचालक जी. वाय. अष्टेकर, विजय पावशे, नाथाजी पाटील, संतोष कडोलकर, मल्लाप्पा तळवार उपस्थित होते.
स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यानंतर सर्व संचालकांनी दीपप्रज्वलन केले. अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या हस्ते छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविकमध्ये सभासद बसवंत पाटील यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा सांगितला.
गुणी विद्यार्थ्यांचा गौरव
विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी २०२२-२३ सालामधील वार्षिक परीक्षेमध्ये दहावी व बारावीमध्ये ७० टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या सभासदांच्या गुणी मुलांना ट्रॉफी व रोख रक्कम देऊन गौरव करण्यात आला.
सेक्रेटरी अनिल कडोलकर यांनी अहवाल वाचन करून, नफा तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन केले. उपाध्यक्ष सुभाष हुद्दार म्हणाले, संस्थेला सन २०२२-२३ मध्ये १ कोटी १० लाख १५ हजार रुपये निव्वळ नफा झाला असून सभासदांना २१ टक्के लाभांश वाटप करणार आहे.
यावेळी संचालक नाथाजी पाटील, संचालिका मालू पाटील, सदानंद चव्हाण यांनी विचार मांडले. संचालक मल्लाप्पा तळवार यांच्या सहावर्षाच्या चिरंजीवाने इंग्लिश माध्यममध्ये संस्थेच्या प्रगतीबद्दल आपले बाल विचार मांडले.
सभेला सभासद, कर्मचारी व हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक संतोष कडोलकर यांनी केले. प्रशांत पवार यांनी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta