बेळगाव : बेळगाव महापालिकेला मराठी भाषेची ऍलर्जी झाल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या महानगरपालिकेच्या सर्वसाधारण बैठकीची नोटीस पुन्हा कन्नड व इंग्रजी भाषेतून देण्यात आल्याने मराठी नगरसेवकांनी या नोटीसा नाकारल्या आहेत. मागील बैठकीच्या वेळी मराठी भाषिक नगरसेवकांनी मागणी केल्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांनी आश्वासन दिले होते की, या पुढील बैठकीच्या नोटीसा तीनही भाषेमध्ये देण्यात येतील मात्र महापौरांचे हे आश्वासन हवेत विरल्याने मराठी भाषिक नगरसेवकातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव महानगरपालिकेत सर्वाधिक मराठी भाषिक नगरसेवक आहे. त्यांना कन्नड व इंग्रजी भाषा समजणे अवघड जात आहे. बैठकीचा अजेंडा माहीत नसल्यामुळे सभागृहांमध्ये प्रश्न उपस्थित करणे किंवा आपल्या वार्डातील समस्या मांडणे अवघड बनत चालले आहे. त्यामुळे महानगरपालिकेत भाषेचे राजकारण नको असे म्हणत सत्ताधारी भाजपच्या मराठी नगरसेवकांनी यापुढील नोटीसा मराठीतून देण्यात याव्यात, अशी मागणी केली होती. मात्र या मागणीला महापौरांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांना आपले मत व्यक्त करण्याची मुभा आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महानगरपालिकेचे सर्वसाधारण बैठक दिनांक 16 ऑगस्ट रोजी होणार आहे त्याच दिवशी मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्यामुळे बैठकीला अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत का असा प्रश्न विचारण्यात येत आहे. मराठी नगरसेवक या प्रकारामुळे कोणती भूमिका घेणार हे मात्र पाहावे लागणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta