बेळगाव : भारत सरकारचे माहिती व प्रसारण मंत्रालय, केंद्रीय दळणवळण खाते, बेळगाव व धारवाड जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, माहिती आणि सार्वजनिक संपर्क खाते, आरोग्य खाते आदींच्या संयुक्त सहकार्याने आयोजित विशेष जागृती छायाचित्र प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
शहरातील कोल्हापूर सर्कल नजीकच्या बहुउद्देशीय इनडोअर स्टेडियममध्ये सलग पाच दिवस या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या काल गुरुवारी आयोजित उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार मंगला अंगडी आणि राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी उपस्थित होते. त्याचप्रमाणे यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी नितेश पाटील, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, केंद्रीय दळणवळण खात्याच्या क्षेत्रीय प्रचारक अधिकारी श्रुती एस. ए., कृषी खात्याचे सहसंचालक शिवणगौडा पाटील आदी हजर होते. खासदार मंगला अंगडी यांच्या हस्ते फीत कापून तसेच व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते झाडाच्या रोपाला पाणी घालून प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी केंद्र सरकारने गेल्या 9 वर्षाच्या कालावधीत अनेक योजना सुरू केल्या आहेत. गरीब कल्याण योजना, आवास योजना, कृषी उज्ज्वला, किसान सन्मान, पोषण आहार, आयुष्यमान भारत, आरोग्य, शिक्षण, स्वयंरोजगार आदींसह अनेक योजना लागू झाल्या असून जनतेने त्यांचा वेळीच लाभ घ्यावा, असे आवाहन केले. याप्रसंगी खासदार मंगला अंगडी यांनी देखील समायोचित विचार व्यक्त केले प्रास्ताविक भाषणात श्रुती एस. ए. यांनी प्रदर्शन भरविण्याचा उद्देश स्पष्ट करून राज्याच्या 7 जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारच्या लोकाभिमुख योजनांची माहिती देणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली. उद्घाटनानंतर प्रमुख पाहुण्यांनी प्रदर्शनाचा फेरफटका मारून माहिती घेतली. उद्घाटन समारंभास महिला व सहाय्य गटांसह बहुसंख्य नागरिक आणि विविध शाळांचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta