बेळगाव : मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र पळविले आहे. बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी दुपारी रानडे रोड, हिंदवाडी येथे ही घटना घडली आहे. सायंकाळी टिळकवाडी पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
अश्विनी विजय पावले (वय ३८) रा. पांगुळ गल्ली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. भामट्यांचा माग काढण्यासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यात आले. मात्र, भामटे सापडले नाहीत. बुधवारी दुपारी अश्विनी या एका नातेवाईकाच्या घरी सांत्वनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत नणंद वैजयंती मोहिते याही होत्या. सुभाष मार्केट, हिंदवाडी येथील नातेवाईकांच्या घरी भेटून तेथून बाहेर पडताना दुपारी ३ च्या सुमारास रानडे रोड, पहिल्या क्रॉसवर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामट्यांनी हे कृत्य केले आहे.
केटीएम ड्यूक मोटारसायकलवरून हे दोघे भामटे आले होते. मोटारसायकलला नंबरप्लेट नव्हती. पाठीमागे बसलेल्या भामट्याने अश्विनी यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. भामट्याने पांढरा शर्ट, टोपी व मास्क बांधला होता. मोटारसायकल चालविणाऱ्या भामट्याने निळे जॅकेट परिधान केले होते. सुमारे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र पळविण्यात आले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta