बेळगाव : येथील हलगा गावच्या माजी सैनिक संघाच्या वतीने गोगटे कॉलेजचे प्राध्यापक सागर संताजी संभाजी यांना विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी बहाल करण्यात आली आहे. यानिमित्त त्यांचा सत्कार हलगे गावातील माजी सैनिक संघाच्या वतीने रविवारी करण्यात आला. यावेळी गावातीलच श्रद्धा मोरे या मुलीने फिजिओथेरपी विषयात पदवी मिळविल्यामुळे तिचाही सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सैनिक संघाचे परशराम हनुमंताचे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रणझुंजार दैनिकाचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर होते.
सागर संताजी संभाजी यांनी गोगटे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतानाच ही डॉक्टरेट पदवी फक्त चार वर्षात मिळविली. त्यांचे शिक्षण हलगे गावातील कन्नड प्रायमरी शाळेत झाले. तर हायस्कूलचे शिक्षण बीके मॉडेल स्कूल मध्ये झालेले होते. मातृभाषेतून शिकत त्यांनी बीई, एम टेक ही पदवी मिळवून इलेक्ट्रॉनिक्स विषयातील मशीन लर्निंग मध्ये त्यांनी डॉक्टरेट मिळवली आहे, हे कौतुकास्पद असल्याचे मनोहर कालकुंद्रीकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधून मशीन लर्निंग संबंधात त्यानी अनेक प्रबंध सादर करून ही डॉक्टरेट मिळविली आहे. हे खरोखर कौतुकास्पद आहे.
यावेळी बोलताना सागर संभाजी यांनी सांगितले की, मी डॉक्टरेट पदवी कोरोना काळात अभ्यास करून मिळविली आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन देखील आपण उच्च शिक्षण घेऊन यशस्वी होऊ शकतो, यात शंका नाही असे आपणाला वाटते. अभ्यासावर आपले पूर्ण लक्ष केंद्रित केल्यास आपणाला कोणत्याही विषयात प्रगती साधता येते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. मला हलगा गावातील नागरिकांनी बोलावून माझा सत्कार केला. याचा मला अभिमान आहे असे त्यांनी सांगितले. गावातील विद्यार्थ्यांना माझी मार्गदर्शन करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी बोलून दाखविले.
यावेळी फिजिओथेरपी मध्ये आपण पदवी मिळविली आणि आज गावच्या वतीने माझा या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे, याचा मला आनंद होत असल्याचे श्रद्धा मोरे यांनी सांगितले.
यावेळी अध्यक्ष परशराम हनुमंताचे यांनी सागर संभाजी आणि श्रद्धा मोरे यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला आणि गावच्या या मुलानी उच्च शिक्षण घेऊन आपल्या गावचे नाव मोठे केले असल्याचे सांगून याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले.
या कार्यक्रमाला माजी सैनिक संघाचे सर्व सदस्य आणि गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
यावेळी परशशराम येळूरकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमासाठी अनंत बिळगोजी, अनंत बिळगोजी, सुधीर पाटील आणि इतर प्रमुख नागरिक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta