बेळगाव : मराठा मंडळ संस्थेच्या सरकारी अनुदानित शाळांमध्ये लाखो रूपयांचा आर्थिक गैरव्यवहार करून शिक्षकांची भरती करण्यात येत असल्याचे संस्थेच्या एम्.ए. बी.एड्. विशेष गुणवत्ताप्राप्त इंग्रजी विषय शिक्षिका अक्षता नायक यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत आरोप केला.
यासंबंधी बोलताना त्यांनी पुढे सांगितले की, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना याविषयी तक्रार देण्यात आली असून जिल्हाधिकार्यांनी डीडीपीआय व बीईओंना या प्रकरणाची खोलवर चौकशी करून सदर संस्थेवर कडक कारवाई करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. यासंबंधी पुन्हा एकदा पारदर्शीपणे सर्व सरकारी नियमांचे काटेकोरपणे पालन करून व संबंधित कागदपत्रांची काटेकोरपणे छानणी करून सर्व संमतीची कामे रोखण्याचे आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी संबंधित अधिकार्यांना खडसावून सांगितले.
अक्षता नायक यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर नागराजू यांनी आपणास वारंवार सरकारी नोकरीचे स्पष्ट आश्वासन देऊनदेखील आता शिक्षक भरतीची रितसर परवानगी मिळताच अन्य उमेदवाराकडून लाखो रूपये घेऊन आपली घोर फसवणूक केली आहे. 9 वर्षांपूर्वी 12 लाखात सरकारी नोकरी देतो म्हणून खोटे आश्वासन देऊन संस्थेत तीन हजारच्या तुटपुंज्या पगारात काम करवून घेतले. शिवाय मेरीटमध्ये टाॅपर असूनदेखील सातव्या क्रमांकावर असलेल्या अन्य उमेदवारास लाखो रूपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार करून सरकारी नोकरी देण्याचे ठरविले आहे. 20 उमेदवारांना लाखो रूपयांच्या बदल्यात सरकारी नोकरी देत असल्याचेही तक्रारीत सांगितले आहे.
राज्यपाल थावरचंद गेहेलोत, मुख्यमंत्री सिध्दरामय्या, शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा, जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पंतप्रधान मोदींचे पीएमओ कार्यालय, खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, आमदार असीफ सेठ, राज्य शिक्षण आयुक्त बेंगळूर, सीपीआय धारवाड जयश्री शिंत्री, जिल्हा शिक्षणाधिकारी बसवराज नलतवाड, शहर गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्याकडेही तक्रार देण्यात आली आहे.
केवळ आपण ब्राह्मण असल्यानेच माझ्यावर हा अन्याय मराठा मंडळ संस्थेने केल्याचेही त्यांनी नमूद केले. या सर्व प्रकाराने व्यथित होऊन सदर शिक्षिकेला प्रचंड मानसिक धक्का बसला असून यामुळे त्यांना इस्पितळातही दाखल करावे लागले होते. माझ्या तसेच कुटुंबाच्या जिवितास कोणताही धोका झाल्यास राजश्री हलगेकर नागराजू संपूर्ण जबाबदार राहतील, असे अन्यायग्रस्त शिक्षिका अक्षता नायक मोरे यांनी सांगितले आहे. याप्रकरणी हायकोर्टात संस्थेविरूध्द याचिका दाखल करून न्याय मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta