बेळगाव : सध्या विश्वकर्मा समाजाला देण्यात येणाऱ्या जात प्रमाणपत्रात हिंदू मराठा असा उल्लेख केला जातो. त्याऐवजी हिंदू पांचाळ विश्वकर्मा असा उल्लेख करुन समाजाचा समावेश मागासवर्ग २अ मध्ये (ओबीसी) करावा, अशी मागणी विश्वकर्मा सेवा संघातर्फे बुधवारी (दि. ६) जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. तत्पूर्वी चन्नम्मा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.
जात प्रमाणपत्रातील उल्लेखामुळे समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तहसीलदार हिंदू मराठा असे जात प्रमाणपत्र देत आहेत. त्याऐवजी हिंदू पांचाळ विश्वकर्मा असे प्रमाणपत्र द्यावे. समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करावा. आमच्या समाजाशी संबंधित लोहार, सुतार, पांचाळ, कम्मार, बडीगेर, पत्तार असे
उद्योग करणाऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन द्यावे. समाजातील लोकांना शासनाने आश्रय योजनेंतर्गत घरे बांधून द्यावीत. महिलांना स्वयंउद्योगासाठी सवलती जाहीर कराव्यात. समाजातील सर्वांना दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डे उपलब्ध करुन द्यावीत. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती सुरु करावी. कारागिरांना कामगार कार्ड उपलब्ध करुन द्यावे, अशा मागण्यांचा अंतर्भाव असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसूरकर, उपाध्यक्ष बाळू सुतार, सचिव राजू सुतार, उपसचिव जोतिबा लोहार, खजिनदार संदीप मंडोळकर, उपखजिनदार अरुण देसूरकर, दिव्याश्री सुतार, सोनाली मंडोळकर, नीता लोहार, संपदा बेळगावकर, तेजस्विनी लोहार, करुणा सुतार, राणी सुतार यांच्यासह समाजातील अन्य लोक उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta