बेळगाव : मंगळूर जिल्ह्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी घडलेल्या 17 वर्षीय सौजन्या या युवतीच्या बलात्कार -खून प्रकरणातील खऱ्या आरोपीला शोधून कठोर शासन करावे. यासाठी हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडे सोपवावे. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी श्रीराम सेनेतर्फे सरकारकडे करण्यात आली आहे.
सौजन्या बलात्कार व खून प्रकरणाला न्याय मिळावा या मागणीसाठी श्रीराम सेनेतर्फे आज बुधवारी 13 सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हा केंद्राच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून सरकारला निवेदन सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार श्रीराम सेना बेळगाव जिल्हा शाखेतर्फे राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. त्यानंतर सरकारच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. सौजन्या खून -बलात्कार प्रकरणी सरकारने सीबीआयकडून केला जाणारा तपास व चौकशी थांबवावी. त्याऐवजी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून या प्रकरणाची चौकशी केली जावी. सौजन्या बलात्कार -खून प्रकरणाचे तपास अधिकारी, वैद्याधिकारी आणि संबंधित अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून कर्तव्यात कसूर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करावी. मयत सौजन्या हिच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. त्याचप्रमाणे या कुटुंबाला संरक्षणही पुरवावे, अशा मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहेत.
यासंदर्भात प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना राज्याध्यक्ष गंगाधर कुलकर्णी म्हणाले की, मंगळूर जिल्हातील बेळींगडी तालुक्यातील धर्मस्थळ येथे 11 वर्षांपूर्वी सौजन्या बलात्कार व खुनाचे प्रकरण घडले होते. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली होती. गेली 11 वर्ष या प्रकरणाची न्यायालयीन सुनावणी होत आहे. या बलात्कार -खून प्रकरणी सीओडी, सीबीआय वगैरे सर्व चौकशी तपास झाले. मात्र अखेर ज्या आरोपीला गजाआड करण्यात आले होते त्याची निर्दोष मुक्तता झाली. संतोष राव असे त्या आरोपीचे नांव असून तो सहा महिने तुरुंगात होता. आमचा सरकारला सवाल आहे की संतोष राव जर गुन्हेगार नसेल तर खरा गुन्हेगार कोण आहे? तसेच त्याला समोर आणले गेले पाहिजे. ती जी दुर्दैवी घटना घडली होती तिचे सर्व साक्षी-पुरावे नष्ट करण्यात आले आहेत. तपासाचा जो पहिला 72 तासाचा कालावधी असतो ज्याला गुन्ह्याच्या तपासाचा सुवर्ण कालावधी म्हटले जाते याच कालावधीत सदर बलात्कार खून प्रकरणातील गुन्हेगाराला गजाआड करावयास हवे होते. मात्र तसे न घडता साक्षी पुरावे नष्ट करण्यात आले. हे कोणाच्या दबावापोटी घडले आहे? या सर्व कृतंत्रामागे कोण आहे? ते देखील उघड झाले पाहिजे. खरंतर तपास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी या सर्वांनी या प्रकरणाची व्यवस्थित चौकशी व तपास करायला हवा होता. मात्र तसे घडले नाही. तेंव्हा आमची मागणी आहे की या घटनेमागच्या मुख्य सूत्रधाराला उजेडात आणून कठोर शिक्षा केली जावी. तसेच याप्रकरणी कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जावी. या खेरीज उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांकडून या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी व तपास केला जावा, असे कुलकर्णी यांनी सांगितले. याप्रसंगी श्रीराम सेनेचे बेळगाव अध्यक्ष रविकुमार कोकितकर, विभागीय कार्याध्यक्ष विनय अंग्रोळी, जिल्हाध्यक्ष विठ्ठल गड्डी आदी पदाधिकाऱ्यांसह बरेच कार्यकर्ते उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta