बेळगाव (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्यातील जनावरांमध्ये पुन्हा त्वचेच्या गाठींचा आजार (चर्मरोग) आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून बेळगाव जिल्ह्यात पशुबाजार, महोत्सव आणि प्रदर्शनावर बंदीचा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जारी केला आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्याच्या काही तालुक्यातील जनावरांमध्येही अल्प प्रमाणात या त्वचा रोगाची लक्षणे आढळली आहेत. पशु संगोपन विभागामार्फत या जनावरांवर उपचार सुरु आहेत.
लक्षणे नसलेल्या गुरांपैकी ५२३,७३७ जनावरांना खबरदारीचा उपाय म्हणून आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी शेळी पॉक्स विरूद्ध लसीकरण करण्यात आले आहे. केंद्र आणि राज्य सरकारी संस्थांनी नियमनासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कार्यवाही सुरु आहे. त्यानुसार इतर भागातून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पशुपालन, पशुमेळा, कॅटल शो यांवर बंदी घालण्याची गरज असल्याचे पशुसंगोपन आणि संवर्धन विभागाच्या उपसंचालकांसह पशुवैद्यकीय सेवा विभाग, बेळगाव यांनी कळविले आहे.
बेळगाव जिल्ह्यातील जनावरांमध्ये त्वचेच्या गाठींचा आजार (चर्मरोग) आढळून आला आहे. आजार रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्याच्या सीमारेषेला लागून असलेल्या बेळगाव जिल्ह्यात पशु महोत्सव आयोजित केल्याची माहिती प्राप्त होती. पण खबरदारीचा उपाय म्हणून पशुबाजार, महोत्सव रद्द करण्याचा आदेश जारी करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील अथणी, कागवाड, चिक्कोडी, निप्पाणी, रायबाग, गोकाक हे महाराष्ट्र राज्याच्या सीमेला लागून असलेले तालुके आणि मुदलगी तालुक्यात इतर भागात त्वचेच्या गाठींचा आजार आढळून आल्याने या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बेळगाव जिल्ह्यात पशु महोत्सव, पशु मेळा, पशु प्रदर्शनावर बंदी आणि आंतरराज्य आणि जिल्हांर्तगत जनावरांच्या वाहतुकीवर आज शनिवार दि. १६ -९-२०२३ पासून पुढील आदेशापर्यंत बंदी घालण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भादंवि कलम १८८ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta