बेळगाव : स्मार्टसिटीच्या चुकीच्या कामांविरोधात बेळगाव नागरिक हितरक्षण समितीतर्फे आज शिवाजी उद्यान परिसरात आंदोलन करण्यात आले. यावेळी स्मार्टसिटीतील कामांचा फटका बसलेले अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेतलेल्या विविध चुकीच्या कामांविरोधात पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांच्याकडे नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचला. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अधिक प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर म्हणाले, स्मार्टसिटीच्याना वाखाली मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. तरीही स्मार्टसिटीच्या कामाला कोणत्या आधारे पुरस्कार दिला आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच स्मार्टसिटीच्या कामामुळे सहाजणांचा मृत्यू झाला, त्यांच्या वारसांना अद्याप भरपाई दिलेली नाही. स्मार्टसिटीतून एलईडी व इतर प्रकारचे दिवे लावण्यासाठी उभारलेल्या खांबाची किंमत कमी आहे, मात्र खांबांची रक्कम वाढवून दाखवली आहे. त्यामुळे प्रत्येक खांबामागे ४० हजारांचा भ्रष्टाचार झाला आहे.
सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद म्हणाले की, शहापूर बँक ऑफ इंडिया ते जुना पी. बी.रोड या रस्त्याच्या रुंदीकरणात निष्पाप लोकांची घरे पाडण्यात आली. हा रस्ता पूर्णत: अशास्त्रीय असून दोषी अधिकार्यांवर उच्चस्तरीय चौकशी करावी, विशेषत: शहापूर बँक ऑफ इंडियापासून जुन्या पी. बी. रस्त्याचे रुंदीकरण बेळगाव स्मार्ट सिटीच्या अधिकार्यांनी आमदारांच्या सोयीनुसार केला आहे.
शाहपूर बँक ऑफ इंडिया ते पी.बी. रोड रस्ता रुंदीकरणात घरे गमावलेले लोक न्यायालयात गेले. न्यायालयाने स्मार्ट सिटीला नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले. तसेच न्यायालयाचा निकाल असतानाही बुडा आयुक्तांनी बेकायदेशीररीत्या रस्ता रुंदीकरणाची सोय केली असून, या कामात जनतेच्या कराचा पैसा वाया घालणाऱ्या अधिकाऱ्यांकडून या नुकसानीची भरपाई वसूल करावी, अशी मागणी केली आहे. प्रामुख्याने स्मार्ट सिटी प्रकल्पातून मिळणारे अनुदान हे राष्ट्रीयीकृत बँकेत ठेवायचे असले तरी ते रत्नाकर बँक लिमिटेडमध्ये ठेवण्यात आले आहे याचे कारण समजणे गरजेचे आहे आणि याचा तपास झाला पाहिजे. एकूणच केंद्र सरकारचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटीची कामे दर्जेदार नाहीत. रस्त्याची कामे अशास्त्रीय व निकृष्ट दर्जाची असून, त्याची लवकर चौकशी करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
आम आदमी पक्षाचे नेते राजू टोपन्नावर म्हणाले की, काँग्रेस रोडसह काही भागात पावसाचे पाणी रस्त्यावर येते. स्मार्ट सिटी कृती आराखडा तयार करताना सुरुवातीला रॉयल कॅनॉल आणि प्राथमिक कालवे विकसित करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र आता कालवे विकसित झालेले नाहीत. पावसामुळे रस्त्यावर पाणी वाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बुट्ट्या, फलक घेत घोषणाबाजी
नागरिकांनी शिवाजी उद्यान ते बँक ऑफ इंडिया कॉर्नरपर्यंत मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक दुसऱ्या मार्गाने वळविली. महिला हातात बुट्ट्या तर नागरिक वेगवेगळ्या प्रकारचे फलक हातात घेऊन घोषणाबाजी करत होते. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांसह विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.