बेळगाव : जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयात गांधी जयंतीदिनी ओली पार्टी करणाऱ्या आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी यांनी याप्रकरणी सात कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याचा आदेश बुधवारी बजावला आहे.
जिल्हा आरोग्याधिकारी यांचे वाहनचालक मंजुनाथ पाटील यांच्यासह महेश हिरेमठ, रमेश नाईक, सत्यप्पा तम्मण्णवार, अनिल तिप्पण्णावर, दीपक गावडे, यल्लाप्पा मुनवळ्ळी अशी निलंबित केलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोच्या आवारात जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या मागील बाजूला गांधी जयंतीदिनी ओली पार्टी केल्याचा एक व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल
झाला होता. याबाबत सर्व स्तरांतून नाराजी व्यक्त झाल्यानंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने या प्रकाराची चौकशी सुरू केली होती. कार्यालयाच्या मागील बाजूला जरी पार्टी केल्याचे चौकशीत आढळून आले असले तरी ती गांधी जयंतीदिनी केली नसल्याचे आरोग्य खात्याचे म्हणणे आहे.
एका कर्मचाऱ्याने पार्टीत सहभागी असलेल्यांचा बनवलेला व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात गांधी जयंतीदिनी कार्यालयात गांधीजींच्या प्रतिमेसमोरच मद्यधुंद अवस्थेत कर्मचाऱ्यांनी गायन, नृत्य करत गप्पा मारल्याचे दिसून आले होते. गांधी जयंतीनिमित्त मद्य आणि मांस विक्रीवर बंदी असते; तरीसुद्धा हा प्रकार आरोग्य खात्याच्या कार्यालयात घडल्याने त्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला होता. त्यामुळे आरोग्य खात्याने याची गंभीर दखल घेऊन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली.