बेळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. निवडणुकीत सुसूत्रपणा आणण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी. असा प्रस्ताव राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठविला होता. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यास मंजुरी दिली असून, बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १२ विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची संख्या ९० ने वाढविण्यात आली आहे.
याआधी जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांत एकूण ४,४३४ मतदान केंद्रे होती. त्यामध्ये ९० केंद्रांची भर पडली असून, यापुढे जिल्ह्यात एकूण ४,५२४ मतदान केंद्रे होणार आहेत. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या वाढीव ९० मतदान केंद्रांचा समावेश राहणार आहे. राज्य मुख्य निवडणुक अधिकाऱ्यांनी याबाबत बेळगाव जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयास पत्र पाठविले आहे. जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांची संख्या वाढणार आहे, तर अथणी, कागवाड, हुक्केरी, अरभावी, कित्तूर आणि बैलहोंगल मतदारसंघांतील केंद्राची संख्या पूर्वीप्रमाणेच राहणार आहे.